‘आदर्श’ प्रकरणांसह वेगवेगळय़ा घोटाळय़ांवरून विरोधकांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षाविरुद्ध राळ उठवूनही नांदेडकरांनी मात्र त्यांचेच नेतृत्व मान्य करीत काँग्रेसच्या पारडय़ात बहुमत टाकले. ४१ जागा पटकावत बहुमत गाठणाऱ्या काँग्रेसला नव्यानेच स्थिरावलेल्या ‘एआयएमआयएम’ने मात्र जोरदार धक्का देत ११ जागांवर झेंडा फडकावला. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अत्यंत सुमार ठरला, तर भाजपचीही घसरगुंडी उडाली.
नांदेड-वाघाळा महापालिकेच्या ८१ जागांपैकी काँग्रेसची एक जागा बिनविरोध आली. ८० जागांसाठी ५१० उमेदवार रिंगणात होते. रविवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी सकाळी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या सभागृहात मतमोजणीला प्रारंभ झाला.
 ८०पैकी ४१ जागा जिंकत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविले. गेल्या १० वर्षांपासून नांदेड-वाघाळा महापालिकेवर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. महायुतीला १६ जागांवर (शिवसेना १४, भाजप २) समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते या प्रचारात ‘समझोता’ एक्सप्रेसच्या नावाखाली उतरले खरे, पण मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवत त्यांच्या पारडय़ात १० जागा टाकल्या. सुमारे दोन वर्षांपूर्वी मुस्लिमबहुल भागात नव्यानेच पक्षाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ऑल इंडिया मजलिस इतेहदुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) या पक्षाने शहरातल्या वेगवेगळय़ा भागांत ११ जागा पटकावल्या. संविधान पार्टीसोबत एआयएमआयएमने युती केली होती. संविधान पार्टीनेही दोन जागा जिंकून खाते उघडले.    

Story img Loader