सत्ता गेल्यानंतर काँग्रेस पक्षाने प्रथमच केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ केलेले रास्ता रोको आंदोलन अवघ्या तीन मिनिटांत आटोपते घेतले. जिल्हास्तराचे स्वरूप देऊन आयोजित केलेल्या या आंदोलनात मोजकेच पदाधिकारी सहभागी झाले होते. मात्र वक्त्यांनी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या धोरणांवर जोरदार टीका केली.
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात राज्यभरात काँग्रेसने काल आंदोलन केले. मात्र नगरमध्ये आज, मंगळवारी दुपारी शहरातील बाजार समिती चौकात आंदोलन केले. काल दाट लग्नतिथी असल्याचे व तसेच पक्षाचे निरीक्षक स्वराज वाल्मीकी यांनी आज पक्षाची नगरमध्ये बैठक आयोजित केल्याचे निमित्त त्यासाठी पुढे करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आ. बाळासाहेब थोरात अनुपस्थित होते.
नैसर्गिक संकटांनी उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना भाजप-सेनेने तुटपुंजी मदत देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसली व फसवणूक केली, कर्जमाफी टाळून शेतकऱ्यांचा सरकारने विश्वासघात केला, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी होऊनही सरकार दुप्पट भाव आकारून जनतेची लूट करत आहे, इंधनाचे दर कमी झाल्याने एसटीची भाडे कमी करून त्याचा प्रवाशांना फायदा करून द्यावा, शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेला भूमी अधिग्रहण कायदा रद्द करावा, कामगारांना देशोधडीला लावणारा जुलमी कायदा रद्द करावा, अन्नसुरक्षा योजनेचे अंशदान सुरू ठेवावे, मुस्लिमांना आरक्षण द्यावे आदी मागण्यांचे निवेदन पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपअधीक्षक वाय. डी. पाटील यांना देण्यात आले.
आ. भाऊसाहेब कांबळे, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, निरीक्षक अश्विनी बोरस्ते, माजी जिल्हाध्यक्ष विनायक देशमुख, प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब हराळ, उबेद शेख, वसंतराव कापरे, संपत म्हस्के, मिठूभाई शेख आदींची चौकातील एका कोपऱ्यात भाषणे झाली. उपमहापौर सुवर्णा कोतकर, माजी नगरसेवक निखिल वारे, राहुल झावरे, सभापती बाबासाहेब दिघे, सविता मोरे, बाळासाहेब भुजबळ, सचिन गुजर, केशवराव मुर्तडक आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक हाती धरले होते. नागरिकांची अडचण नको असे सांगत अवघ्या तीन मिनिटांतच रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

Story img Loader