अमरावती जिल्हा नियोजनाच्या आढावा बैठकीत जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्यात खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत मिळावी ही मागणी रवी राणा यांनी जोर लावून धरली होती. दरम्यान यावेळी बैठकीतच सर्वांसमोर दोघांमध्ये तू-तू-मै-मै झाली. यानंतर यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्यावर टीका केली असून शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचं नाटक सोडून लोकप्रतिनिधींशी कसं वागावं हे शिकावं असा टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बैठकीत नेमका काय वाद झाला –

बैठकीदरम्यान रवी राणा यांनी आपल्याला बोलायचं असल्याचं सांगत आपलं म्हणणं ऐकून घेत नसल्याने आक्षेप नोंदवला. दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याची मागणी यावेळी ते करत होते. दरम्यान त्यांचा वाढलेला आवाज पाहून यशोमती ठाकूर यांनी त्यांना आवाज कमी ठेवा, बोट दाखवायचं नाही असं सांगत संताप व्यक्त केला. यानंतरही रवी राणा यांनी आपलं म्हणणं मांडलं. इथे दादागिरी चालणार नाही असंही ते म्हणाले. ठराव घेऊन शासनाला पाठवावा अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

बैठकीत नेमकं काय संभाषण झालं –

यशोमती ठाकूर – अजून काही बोलायचं आहे कोणाला?
रवी राणा – माझं तरी ऐका…अरे मी आमदार आहे इथे बसलोय
यशोमती ठाकूर – व्यवस्थित बोला, आवाज कमी ठेवा…बोट दाखवायचं नाही
रवी राणा – मी इथे बसलोय…जिल्हाधिकारी मॅडम आहेत…तुम्ही आहात…माझी तुम्हाला विनंती आहे
यशोमती ठाकूर – खाली बसा
रवी राणा – या ठिकाणी दादागिरी चालणार नाही
यशोमती ठाकूर – काय दादागिरी?
रवी राणा – मी सदस्य आहे इथला…मी बोलणार आहे
यशोमती ठाकूर – काय बोलणार..जाऊन बोला ना काय बोलायचं ते
रवी राणा – शेतकरी इथे आत्महत्या करत आहेत, सोयाबीन खराब झालेलं आहे..संत्र खराब झालेलं आहे…त्याच्यावर काय करणार आहात आपण? शेतकऱ्याची दिवाळी साजरी होणार आहे की नाही? त्याच्या खात्यात पैसे टाकणार आहात की नाही? या सभागृहात एकमताने ठराव घ्या की मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या आधी २८ तारखेच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले पाहिजेत…तर त्या शेतकऱ्याची दिवाळी होईल.
रवी राणा – माझी एवढी विनंती आहे. शेतकऱ्यासाठी कळकळीची…
यशोमती ठाकूर – खाली बसा…खाली बसा…खाली बसा
रवी राणा – तुम्ही ठराव घ्या. जिल्ह्यातर्फे ठराव घेऊन शासनाला पाठवा.

रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने जिल्ह्यात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान रवी राणा यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होण्याआधी भवनाच्या बाहेरच कुजलेलं सोयाबीन जाळत, संत्री, कुजलेलं सोयाबीन फेकून देत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर बैठक सुरू झाली असता यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

बैठकीनंतर बोलताना रवी राणा यांनी फक्त देखावा म्हणून ही बैठक आयोजित केली असल्याची टीका केली. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली तर शेतकरी मातोश्रीवर जातील आणि उद्धव ठाकरेंची दिवाळी साजरी होऊ देणार नाहीत असा इशारा यावेळी त्यांनी दिली.

अशी स्टंटबाजी, चिल्लरगिरी आणि थिल्लरगिरी…

“अमरावतीच्या इतिहासाला काळीमा फासण्याचा प्रकार आज घडला आहे. अमरावतीचा इतिहास अशी स्टंटबाजी, चिल्लरगिरी आणि थिल्लरगिरीचा नाही. अमरावती जिल्हा आणि नागरिकांवर माझा विश्वास असून ते खऱा न्याय देतील असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.