इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राहुल गांधी आज मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत येताच त्यांनी अदाणी प्रकरणावरून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र डागलं आहे. यावरून आता भाजपानेही राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे. टीका करताना भाजपाने काँग्रेस आणि अदाणी कुटुंबीयांचे संबंधच उघड केले आहेत.
भाजपाने ट्वीट करत म्हटलं आहे की, “बालीश पुन्हा एकदा बरळला… राहुल गांधीनी खालील गोष्टींचा खुलासा करावा. राहुल गांधी यांचे जिजाजी प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रॉ आणि उद्योगपती अदानी यांचे संबंध काय? ते कोणत्या प्रकल्पावर काम करत आहेत? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
“बालबुद्धी राहुल गांधींनी सांगावे…”
“ममता बॅनर्जी आणि उद्योगपती अदानी एकमेकांना का भेटले? राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, गौतम अदानी सोबत काय करत आहेत? शरद पवारांचे आणि उद्योगपती अदानी यांचे काय संबंध आहेत? का वारंवार गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला जातात? हिडनबर्ग रिपोर्ट संदर्भात JPC शिफारस शरद पवारांनी का फेटाळून लावली? हे शरद पवारांना कधी विचारलं का? २०१३ मध्ये महाराष्ट्रातील तिरोडा येथील ६६० मेगावॅटचा थर्मल पावर प्लांट तत्कालीन काँग्रेस सरकारने अदानीला का दिला? बालबुद्धी राहुल गांधींनी सांगावे, याच मुंबईतील अदानी समूहाला मुंबईतील मोक्याच्या ठिकाणचे भूखंड काँग्रेसने का दिले?” असे प्रश्न भाजपाने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून विचारला आहे.
हेही वाचा >> “तो पैसा कोणाचा?” मुंबईत येताच अदाणी प्रकरणावरून राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना तीन सवाल
“अदानी समूहाला २०१४ पूर्वी काँग्रेस सरकार कडून कोणकोणते पुरस्कार दिले आहेत हे जनतेला कळलं पाहिजे. काँग्रेसच्या मनमोहनसिंग सरकारने अदाणी समूहाला ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं होतं. २०१०-११ साठी मनमोहनसिंग सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाकडून औष्णिक ऊर्जा प्रकल्प – युनिट-१ त्वरित पूर्ण केल्याबद्दल गोल्ड शील्ड पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार २०१३, ऊर्जा मंत्रालय, मनमोहनसिंग सरकार कडून देण्यात आला. २०१३ मध्ये याच काँग्रेसच्या कर्नाटकमधील सिद्धरमैय्या सरकारने सर्वश्रेष्ठ सुरक्षित पॉवर बॉयलर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. असे अनेक पुरस्कार याच काँग्रेसने अदानी समूहाला दिलेले आहेत”, अशी टीकाही भाजपाने केली आहे.
हेही वाचा >> “अदाणी देशातली विमानतळं, बंदरं खरेदी करतायत, परंतु पैसा…”, मुंबईत येताच राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
“ज्या व्यक्तीला NCC चा फुलफॉर्म माहिती नाही, तो व्यक्ती देशाच्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, बेरोजगारीबद्दल ज्ञान पाजळतो. ज्या व्यक्तीला देशाचं ५२ सेकंदाचे राष्ट्रगीत समजून घ्यायला २८ सेकंद लागतात, तो व्यक्ती आज वाट्टेल तसे आरोप करत आहे”, असंही भाजपाने म्हटलं आहे.
राहुल गांधींनी काय आरोप केले?
खासदार राहुल गांधी म्हणाले, गौतम अदाणी हे त्यांच्या परदेशी भागीदारांबरोबर मिळून भारतातल्या शेअर बाजाराची दिशाभूल करत आहेत. परदेशी भागीदारांबरोबर मिळून भारतातल्या पायाभूत सुविधा ते खरेदी करत आहेत. परंतु, पंतप्रधान मोदी यावर काहीच बोलत नाहीत, ते याप्रकरणी शांत आहेत. राहुल गांधी म्हणाले, अदाणींच्या कंपनीत पैसा कोणाचा आहे? तो पैसा अदाणींचा आहे की आणखी कोणाचा आहे? जर तो पैसा अदाणींचा नसेल तर मग तो नेमका कोणी गुंतवला आहे? याची उत्तरं मिळाली पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी याविषयी काहीच बोलत का नाहीत? आपल्या देशातल्या तपास यंत्रणा गौतम अदाणी प्रकरणावर काहीच कार्यवाही का करत नाहीत? सीबीआय, ईडीसारख्या संस्था अदाणी प्रकरणाचा तपास का करत नाहीत? या संस्था अदाणी यांची चौकशी का करत नाहीत? असे अनेक प्रश्न राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केले.