आपल्याच पक्षातील लोक माझ्या विरोधात षङय़ंत्र रचत असून, मी पक्ष सोडणार नाही, पण घरभेदी ओळखा, असा इशारा उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव यांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार जाधव यांनी रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. किमान हे वर्षभर तरी आपण पक्षाबरोबर राहू, असे सांगून त्यांनी पक्षश्रेष्ठींना विधानसभा निवडणुकीबाबत इशारा दिल्याचेही मानले जात आहे. आपल्या भाषणात त्यांनी सध्याच्या पक्षांतर्गत परिस्थितीबाबत उद्धव ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या विरोधात नाराजीचा सूर आळवला.
हेही वाचा >>> शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रविंद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मला १७३ कोटी…”
आमदार जाधव म्हणाले की, शिवसेना फुटली तेव्हा गटनेता म्हणून त्या पदावर माझा दावा होता. पण त्यावेळी मला गटनेता केले नाही. तेव्हा मी फार काही बोललो नाही. शिवसेना फुटीनंतर ज्यावेळी मुंबईत बैठक बोलावली, त्यावेळी वर्षांह्णवर मी उद्धव ठाकरेंना सांगितले की, आपण भाजपबरोबर जात असाल तर मी येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मी मंत्री होतो, मात्र ज्येष्ठता असूनही मला शिवसेनेत आल्यावर मंत्रिपद दिले नाही. मी त्यावेळी अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली नाही आणि यापुढेही असे काही बोलणार नाही. माझ्याकडे विदर्भाची जबाबदारी आहे. तेथून एक खासदार आणि पाच आमदार निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतली आहे. त्यामुळे २०२४ पर्यंत मी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे आश्वासन दिले. या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी जाधव यांनी कार्यकर्त्यांना पाठवलेले आवाहन पत्र समाजमाध्यमांवर फिरत आहे. हे करणारे लोक हे घरचे भेदी आहेत, असा आरोप करून ते म्हणाले की, भाजपच्या एका नेत्यांबरोबर संघर्ष झाल्यानंतर पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल केले. त्यावेळी आपल्याच पक्षातील लोकांनी माझ्या समर्थक कार्यकर्त्यांची यादी पोलिसांना दिली.
हेही वाचा >>> यंदा दूध, दुग्धजन्य पदार्थांची दर स्थिर राहणार? वाचा डेअरी उद्योग अभ्यासकांचं मत काय
आमदार शेखर निकम महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मी चिपळूणच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटून आशीर्वाद घेतले. पक्षाचे प्रमुख ठाकरे यांनाही भेटून चिपळूणची जागा शिवसेनेने लढवावी, असा आग्रह धरला. त्यावेळी चिपळूणमधील काही निष्ठावंतांनी नवीन उमेदवार तयार केला. मी गेली दोन महिने शांत असल्यामुळे आता तो उमेदवार शोधण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. आमदार जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांनी या वेळी भावनिक भाषण केले. शिवसेना आणि ठाकरे अडचणीत असताना भास्कर जाधव यांनी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता ठाकरेंची खंबीरपणे बाजू घेतली, असे विक्रांत यांनी नमूद केले तेव्हा जाधव यांचे डोळे पाण्याने डबडबले.