हर्षद कशाळकर, लोकसत्ता
अलिबाग : वारेमाप मासेमारीमुळे भारतीय किनाऱ्यावर आढळणाऱ्या ६५ पैकी ३५ मत्स्यप्रजाती संकटात सापडल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन, मत्स्य संवर्धनासाठी कोकण किनारपट्टीवर समुद्रात १२१ ठिकाणी कृत्रिम भिंत्तिकांची उभारणी केली जाणार आहे. समुद्राच्या तळाशी शास्त्रोक्त पध्दतीने या भित्तिका उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे.
कोकणात पंचवीस वर्षापुर्वी समुद्रात जेवढे मासे मिळत होते, तेवढे आज मिळत नाहीत. या परिस्थिती प्रदुषण आणि हवामानातील बदल कारणीभूत आहेतच, पण त्याच वेळी वारेमाप मासेमारी यास कारणीभूत ठरते आहे. कोकणात १९६०-६२ च्या आसपास यांत्रिक मासेममारीला सुरवात झाली, मासेमारीसाठी सोयी सुविधा उपलब्ध झाल्या. शासनाने सबसिडी उपलब्ध करून दिली. मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी योजना आणल्या. माश्यांचा शोध घेणारे तंत्रज्ञान उपलब्ध झाले. यामुळे कोकणात मासेमारी यांत्रिक बोटींची संख्या झपाट्याने वाढली आहे. पण त्याचवेळी मत्स्य उत्पादन घटत चालले आहे. अनेक मत्स्य प्रजाती नामशेष झाल्या आहेत.
आणखी वाचा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी स्वाक्षरी आणि शिक्के वापरले; मंत्रालयात खळबळ, गुन्हा दाखल
ही बाब लक्षात घेऊन पंतप्रधान मत्स्यसंपदा योजने अंतर्गत कोकण किनारपट्टीवर मत्स्य संवर्धनासाठी कृत्रिम भित्तिका उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत समुद्राच्या तळाशी २० मीटर खोलीवर २ हजार स्वेअर मीटरच्या भित्तिका उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. विशिष्ट रचनेत उभ्या आडव्या संरचनेत या भित्तिका पसरवल्या जाणार आहेत. यामुळे समुद्राच्या तळाची मत्स्य संवर्धनासाठी कृत्रिम अधिवास तयार होण्यास मदत होणार आहे.
रायगड जिल्ह्यात ४५ ठिकाणी, रत्नागिरी जिल्ह्यात ३६ ठिकाणी तर सिंधुदूर्ग जिल्ह्यात ४० ठिकाणी कृत्रिम भित्तिका उभारल्या जाणार आहेत. पाण्याची खोली, जलप्रदूषण, पाण्याची पारदर्शकता, लाटांचे प्रमाण या गोष्टींचा अभ्यास ही ठिकाणे निवडण्यात आली आहेत. येत्या महिन्याभरात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे कोकण किनारपट्टीवर मत्स्यप्रजांतीचे संवर्धन आणि उत्पादन वाढीसासठी मदत होणार आहे..
आणखी वाचा-सावधान! येत्या ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता
कृत्रिम भित्तिका म्हणजे काय…. कृत्रिम भित्तिका हे मासळी एकत्रित करण्याचे एक शास्त्रोक्त अभ्यास करून तयार केलेले साधन आहे. ज्यात सिमेंट, लोखंड दिर्घकाळ टिकणाऱ्या वस्तूंचा वापर करून पोकळ स्वरूपाच्या रचनांची निर्मिती केली जाते. नंतर त्यांची समुद्राच्या तळाची मांडणी केली जाते. माश्यांना सुरक्षित वातावरण तयार झाल्याने ते या ठिकाणी अधिवास करण्यास सुरवात करतात. या ठिकाणी प्रजननाला सुरवात करतात.
रायगड जिल्ह्यात अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन तालुक्यात समुद्रात कृत्रिम भित्तीका उभारणीचे काम सध्या सुरू आहे. २० गावाजवळील ४५ ठिकाणे यासाठी निवडण्यात आली आहेत. श्रीवर्धन आणि मुरूड मधील काम अंतिम टप्प्यात असून त्यानंतर अलिबाग तालुक्यातील काम हाती घेतले जाणार आहे. या प्रकल्पामुळे किनारपट्टीवर मत्स्य उत्पादन वाढील मदत होईल. -संजय पाटील, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग, रायगड