अकोला : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्गावरील लोणी ते मूर्तिजापूरपर्यंत एका बाजूचा ७५ कि.मी. दुपदरी रस्ता चौपदरीकरणाअंतर्गत ‘बिटुमिनस काँक्रिट’चे काम ११० तासांत पूर्ण करण्याचे नियोजन राजपथ इन्फ्रा. या कंत्राटदार कंपनीने केले आहे. या कामाला ३ जून रोजी सकाळी ७.३० वाजता प्रारंभ झाला. गेल्या २९ तासांत दोन लेन मिळून २४ कि.मी. रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. ७ जूनला सायंकाळपर्यंत अखंडपणे हे काम चालणार आहे.
हेही वाचा >>> शेतात राबणाऱ्या वडिलांसाठी पाणी आणायला गेलेल्या मुलीचा विहिरीत पडून मृत्यू
राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती ते नवापूरपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम गत नऊ वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. ४८०.७९ कि.मी. लांबीच्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची अमरावती ते चिखली (नांदुरा अगोदरचे गाव) १९४ कि.मी. आणि फागणे ते नवापूर १४०.७९ कि.मी. अशी विभागणी झाली. मधल्या काळात दोन कंत्राटदार कंपन्यांनी ही कामे सोडली. या कामात विविध अडचणी व अडथळे आले आहे. ‘बीओटी’वर काम करणे अडचणीचे झाल्याने ‘हायब्रीड अॅन्युटी’ तत्त्वावर काम करण्याचा निर्णय झाला.
हेही वाचा >>> काहींना दिवसाही सत्तेची स्वप्न पडतात!; नाना पटोलेंचा धनंजय मुंडेंना टोला
२०२१ मध्ये नव्याने निविदा प्रक्रिया राबवून चार टप्प्यातील काम तीन कंत्राटदार कंपन्यांना देण्यात आले. सध्या हे काम प्रगतिपथावर आहे. पहिल्या दोन टप्प्यातील १०४ कि.मी. च्या रस्त्यांच्या कामाची सरासरी कमी आहे. या रस्त्याच्या अपूर्ण कामावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली होती. कामाला गती यावी, याकरिता ‘बिटुमिनस काँक्रिट’ने सर्वात लांब अखंड रस्त्याची निर्मिती करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात एका बाजूच्या ७५ कि.मी. दुपदरी रस्त्याचे काम केले जात आहे. या कामाला लोणी येथून शुक्रवारी सकाळी प्रारंभ झाला. गेल्या २९ तासांत २४ कि.मी. दुपदरी रस्त्याची निर्मिती करण्यात आली असून काम समाधानकारक सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक तथा महाव्यवस्थापक विलास ब्राह्मणकर यांनी दिली.
हेही वाचा >>> ‘यूपीएससी’ उत्तीर्णाच्या यशात सरकारी संस्थांची श्रेयसाठमारी; यशस्वी उमेदवारांवर एसआयएसी, ‘बार्टी’, ‘सारथी’चा दावा
हा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याची नोंद ‘गिनीज बुक’मध्ये होईल, असा दावा कंत्राटदार कंपनीकडून करण्यात आला. या विक्रमी प्रयत्नाची अंमलबजावणी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. महामार्गावरच माना येथे ‘व्यवस्थापन थिंक टँक’ व ‘वॉर रूम’ उभारण्यात आली आहे. यात चार ‘हॉट मिक्सप्लांट’, चार ‘व्हीललोडर’, एक ‘पेव्हर’, एक ‘मोबाईल फिडर’, सहा ‘टँडेम रोलर’, १०६ ‘हायवा’, दोन ‘न्युमॅटिक टायर रोलर’ आदी यंत्रसामग्रीसह ७२८ मनुष्यबळ कार्यरत आहेत. यासह अभियंता आणि अधिकारी तैनात आहेत.
हेही वाचा >>> धनंजय मुंडे यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठे विधान, म्हणाले “आपलाच…”
विश्वविक्रमाला गवसणी घालणार ?
राजपथने सांगली-सातारादरम्यान पुसेगाव ते म्हासुर्णे रस्ता २४ तासात तयार करून विक्रम स्थापित केला होता. कतारमध्ये सुमारे २४२ तास म्हणजेच १० दिवस निरंतर बांधकाम करून २५ किलोमीटर रस्ता निर्मिती करण्याच्या विश्वविक्रमाची नोंद आहे. हा विश्वविक्रम मोडण्याचे प्रयत्न विदर्भात सुरू आहेत.