देशाची अखंडता आणि प्रभूत्व कायम राखण्यासाठी जीवाची बाजी लावणार्या किसान आणि जवान यांच्या संयुक्त पुतळ्याची उभारणी खानापूर तालुक्यातील खंबाळे गावच्या दर्शनी भागात करण्यात आली आहे.
जय जवान, जय किसान हा नारा खर्या अर्थाने पुतळ्याच्या रूपाने जनतेसमोर उभारण्याचे काम सांगली जिल्ह्यातील विटा आळसंद मार्गावरील खानापूर तालुक्यातील खंबाळे (भाळवणी) गावातील नागरिकांनी केले. गावातील नागरिकांनी जय जवान, जय किसानची प्रचिती देणारा पुतळा उभारला आहे. जो शेतकरी आणि जवान यांचा एकत्रित सन्मान करणारा ठरतोय. पुतळ्याची अर्धी बाजू ही जवानाची असून अर्धी बाजू शेतकर्याची आहे.
जवान आणि शेतकरी अशा वेशभूषेतला हा खास पुतळा गावच्या वेशीवर उभारून आणि त्याच्या भोवताली मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकार्यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. तसेच गावातील तरुणांना सैन्य दलामध्ये भरती होण्याची प्रेरणा मिळावी म्हणून जवानाचा आणि जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकरी देखील आताच्या तरुणांमध्ये तयार व्हावेत या एकमेव हेतूने या अनोख्या पुतळ्याची उभारणी आली आहे. आ. अनिल बाबर आणि गावातील सरपंच आणि सर्व सदस्य आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत या जवान आणि शेतकरी राजाच्या सन्मानाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.