शिर्डी नगरपंचायतीच्या निकृष्ट कामांमुळे जनतेत असंतोष असताना आता दस्तुरखुद्द बांधकाम सभापती वैशाली गोंदकर यांनीच या विरोधात रणशिंग फुंकले आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली असून, ठेकेदाराला काळय़ा यादीत टाकावे व दोषी अधिकाऱ्यांकडून या रकमेच्या वसुली केली जावी, अशी लेखी मागणी त्यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नगरपंचायतीने नुकतेच छत्रपती शिवाजीमहाराज व्यापारी संकुलासमोर केलेले काँक्रीटीकरण निकृष्ट झाल्याचा आरोप गोंदकर यांनी केला आहे. संबंधित ठेकेदाराचे या कामाचे बिल अदा न करता काळय़ा यादीत त्याचा समोवेश करावा असे पत्र त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. या पत्राच्या प्रती त्यांनी जिल्हाधिकारी व विभागीय महसूल आयुक्तांनाही पाठवल्या आहेत. गोंदकर यांनी म्हटले, की नगरपंचायत व्यापारी संकुलाच्या मैदानाचे काम नगरपंचायतीने नेमलेल्या ठेकेदारामार्फत करण्यात आले आहे. मात्र या कामाचा दर्जा अत्यंत सुमार असून दोन महिन्यांतच याला तडे जाऊ लागले असून, खडी निघू लागली आहे. यात वापरण्यात आलेल्या मटेरिअलच्या दर्जा व प्रमाणाबाबत शंका निर्माण झाली आहे.
अशा प्रकारे बोगस काम करणाऱ्या ठेकेदारास बिल अदा करू नये, या कामाबाबत भरलेली अनामत रक्कम जप्त करण्यात यावी, ठेकेदाराचे नाव काळय़ा यादीत टाकावे आदी मागण्या गोंदकर यांनी केल्या आहेत. नवीन भक्तनिवासच्या मागील कालिकानगर रोडला जोडणाऱ्या रस्त्याचे कामही निकृष्ट झाले असून, या रस्त्याच्या कामाचीही त्रयस्थ एजन्सीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नगरपंचायत कार्यालयालगतच्या कामाची अशी अवस्था, तर बाहेरच्या कामांना कोणी वालीच नाही, असे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा