सोलापूर : सोलापुरातील जमीन खरेदीच्या दोन व्यवहारांत सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील दोघा बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध सोलापुरात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संदीप गोविंद रोकडे (वय ४५, रा. बहे, ता. वाळवा, जि. सांगली) या बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, रोकडे यांचा सातारा व सोलापुरात बांधकाम व्यवसाय आहे. सोलापुरात सलगरवाडी परिसरात त्यांच्या मालकीची एक हेक्टर २० गुंठे शेतजमीन आहे. रोकडे यांनी आर्थिक अडचणींमुळे ही शेतजमीन विक्रीला काढली असता, पुण्यातील दोन बांधकाम व्यावसायिक त्यांच्या संपर्कात आले. रोकडे यांच्या मालकीच्या शेतजमिनीचा न्यायालयात दिवाणी वाद प्रलंबित आहे. जर न्यायालयाचा निर्णय विरोधात गेला, तर जमीन खरेदीपोटी घेतलेली संपूर्ण रक्कम बिनव्याजी परत करण्याचे ठरले होते. त्यानुसार तीन कोटी ७२ लाख १२ हजार रुपये किमतीत संपूर्ण शेतजमीन विक्री करण्याचे ठरले. परंतु यात खरेदीपोटी दिलेल्या रकमेचे धनादेश जमीन खरेदी नोंदणी पूर्ण झाल्यानंतर वटविण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे जमीन खरेदीची दस्तनोंदणी सोलापुरात दुय्यम निबंधक कार्यालयात झाली. परंतु नंतर खरेदी करणाऱ्या दोघा बांधकाम व्यवसायिकांनी दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आले. एवढेच नव्हे, तर दस्तनोंदणीमध्ये परस्पर बदल करून बनावटीकरण केलेला दस्त लिहिला गेल्याचे आढळून आले. यात संदीप रोकडे यांची दोन कोटी ९३ लाख ७० हजार रुपये, तसेच ७३ लाख ४२ लाख ५०० रुपये असे मिळून तीन कोटी ६७ लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
संदीप रोकडे यांची फसवणूक करणाऱ्या याच दोघा बांधकाम व्यावसायिकांनी रघुनाथ आनंदा रोकडे (वय ५८, रा. निगडी प्राधिकरण, पुणे) या निवृत्त शिक्षकालाही जमीन खरेदी व्यवहारात दोन कोटी ५२ लाख रुपयांचा गंडा घातला. रोकडे यांच्या मालकीची सोलापुरात नेहरूनगर परिसरात एक हेक्टर जमीन आहे. या जमिनीसंदर्भात दिवाणी न्यायालयात दावा प्रलंबित आहे. न्यायालयाचा निर्णय विरोधात दिला गेल्यास जमीन विक्रीपोटी घेतलेली संपूर्ण रक्कम बिनव्याजी परत करण्याची अट होती. त्यानुसार खरेदी विक्रीचा व्यवहार झाला. या व्यवहारातही फसवणूक झाल्याचे दिसून आल्याने रोकडे यांना धक्का बसला. त्यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदविली. संबंधित दोन्ही आरोपी बांधकाम व्यावसायिकांना अटक झाली नाही.