पावसाळ्यात संभाव्य आपत्तींना सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्येक तालुक्यात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून हे नियंत्रण कक्ष २४ तास सुरू राहणार आहेत. दरडी कोसळून वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून रायगड जिल्हय़ात ९ ठिकाणी संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक विभागाचा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्य़ात मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४, मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७, पळस्पे न्हावा शेवा राष्ट्रीय महामार्ग हे राष्ट्रीय महामार्ग आहेत. तसेच इतर जिल्हय़ांना जोडणारे मार्ग आहेत. पावसाळ्यात या मार्गावर पाणी साचणे, मार्ग उखडणे, मार्गावर दरडी कोसळणे यांसारख्या घटना होतात. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होते. येथील परिस्थितीची माहिती ठेवण्यासाठी कशेडी घाट, ताम्हाणी घाट, बोरघाट, पारघाट, कर्नाळा िखड, काल्रे िखड, भिसे िखड या ठिकाणी संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे अधिकारी या मार्गावरील परिस्थितीची माहिती घेऊन ती जिल्हा नियंत्रण कक्षाला कळविणार आहे. जिल्हय़ातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून हे नियंत्रण कक्ष २४ तास सुरू राहणार आहेत. प्रत्येक विभागाला नियंत्रण कक्ष सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जिल्हय़ात ज्या गावांमध्ये दरडी कोसळण्याची शक्यता आहे. अशा गावांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, रायगड यांच्या सर्वेक्षणानुसार जिल्हय़ातील २४ गावांना दरडीपासून कमी-जास्त प्रमाणात धोका आहे. या गावांमध्ये देखील विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. अतिवृष्टी व त्याच वेळी येणारी भरती यामुळे नदी, खाडी किनारे व समुद्र किनाऱ्यावरील गावांना धोका होऊ शकतो. अशा गावांमध्ये देखील विशेष अधिकारी नेमण्यात आले आहेत.
पावसाळ्यात दोन मोठय़ा भरत्या
जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये समुद्राला ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या २४ भरत्या येणार आहेत. यातील २ भरत्या मोठय़ा असणार आहेत. सर्वात मोठी भरती २६ जून रोजी येणार आहे. ४.९७ मीटर उंचीची ही भरती असेल. २४ जुल रोजी ४.९५ मीटरची भरती येणार आहे.
रायगडात ११.२६ टक्केपाऊस
रायगड जिल्हयात ३ जून रोजी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. काही तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पडलेल्या या पावसामुळे जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते. उन्हाचे चटके सहन करत असलेल्या रायगडकरांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. या पावसामुळे कुठेही जीवित व वित्तहानी झालेली नाही. ३ जून रोजी ११.२६ मिमी पावसाची नोंद झाली. अलिबाग तालुक्यात १९.६ मिमी पाऊस पडला. म्हसळा तालुक्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पावसाची नोंद झाली. मुरुड तालुक्यात ३८.० मिमी पाऊस पडला.