सोलापूर : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा स्वतःच्या सोयीने उद्धव ठाकरे हे चुकीचे भाष्य करीत असून यात न्यायालयाचा अवमान होत आहे. ठाकरे यांच्या प्रतिक्रिया आणि भाषणांचे मुद्दे गोळा करून न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले जाणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
शुक्रवारी, सोलापुरात पक्षाच्या सभा व बैठकांसाठी आल्यानंतर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करीत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार, डबल इंजिनचे सरकार राज्याला निश्चितपणे प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
हेही वाचा – “एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस स्वप्नातही राजीनामा….” अजित पवार यांचा टोला
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये दोनशे जागा भाजपा स्वबळावर जिंकून आणण्यासाठी प्रयत्न हाती घेण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ६० हजार व्यक्तींना भाजपाशी जोडण्याची रचना केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. जेथे आमचे आमदार नाहीत, तेथे आमचा आमदार निवडून येण्याच्या दृष्टीने आमचे पुढील काळात प्रयत्न राहणार असून, त्यासाठी सर्व २८८ मतदारसंघांचा प्रवास आपण करणार आहोत. आम्हाला आम्ही केलेल्या विकास कामांवर मतदान मिळेल. कोणावर टीका करून मते मिळवायची गरज भासणार नाही, असा दावाही बावनकुळे यांनी केला.