सोलापूर : करमाळा तालुक्यातील राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील आणि त्यांचे प्रतिस्पर्धक, माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनलमध्ये लढत होणार आहे.
येत्या १७ एप्रिल रोजी होणाऱ्या या निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांच्या पाठीशी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांची ताकद राहणार आहे. तर त्याविरोधात माजी आमदार संजय शिंदे यांच्याशी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माढा विभाग जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी युती केली आहे. दोन्ही गटांची ताकद पाहता आमदार नारायण पाटील यांच्या पॅनलचे पारडे जड असल्याचे बोलले जाते. यापूर्वी सुमारे २० वर्षे आदिनाथ साखर कारखाना ताब्यात ठेवलेल्या भाजपच्या नेत्या रश्मी बागल आणि त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी या निवडणुकीत स्वतःला दूर ठेवले आहे. मात्र त्यांचा पाठिंबा कोणाला मिळणार, याचे गुपित उघड झाले नाही.
आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे हे दोघेही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शिंदे यांनी आपल्या महायुती-आदिनाथ बचाव पॅनलमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या चार उमेदवारांना सामावून घेतले आहे. तर आमदार नारायण पाटील यांच्या महाविकास आघाडी पॅनलमध्ये मोहिते-पाटील, जयवंत जगताप व सुभाष सावंत यांच्या गटांना प्रतिनिधित्व मिळाले आहे.
या निवडणुकीत दोन्ही पॅनलचे मतदारसंघनिहाय उभे राहिलेले उमेदवार असे: जेऊर गट-श्रीमंत त्र्यंबक चौधरी (उमरड), महादेव श्रीपती मोरे ((कुगाव), दत्तात्रय रामचंद्र गव्हाणे (पोफळज); महायुती पॅनल-चंद्रकांत सरडे, प्रशांत पाटील व प्रमोद बदे; सालसे गट-महाविकास आघाडी-रविकिरण पोपट फुके (करंजे), दशरथ येदू हजारे (जवळा); महायुती-विलास जगदाळे, नवनाथ जगदाळे व नागनाथ चिवटे; पोमलवाडी गट-महाविकास आघाडी-किरण जगन्नाथ कवडे (कात्रज), नवनाथ मधुकर पोळ (वाशिंबे) व संतोष खाटमोडे-पाटील (दिवेगव्हाण); महायुती-दशरथ पाटील, नितीनराजे भोसले व बबन जाधव;
केम गट-महाविकास आघाडी-दत्तात्रय हरिश्चंद्र देशमुख (वांगी-१), विजयसिंह जिजाबा नवले (बिटरगाव) व महेंद्र दिनकर पाटील (तरटगाव); महायुती-माजी आमदार संजय विठ्ठलराव शिंदे, सोमनाथ देशमुख व सोमनाथ रोकडे; रायगाव गट-महाविकास आघाडी-देवानंद गोपाळ बागल (मांगी), ॲड. राहुल सुभाष सावंत (करमाळा) व डॉ. अमोल नानासाहेब घाडगे (तरटगाव); महायुती-अभिजित पाटील, आशिष गायकवाड व विनय नवरे. सहकारी संस्था गट-महाविकास आघाडी-डॉ. हरिदास तुळशीराम केवारे (आळजापूर); महायुती-सुजित बागल.
महिला गट-महाविकास आघाडी-राधिका भीमराव तळेकर (वांगी), उर्मिला हनुमंत सरडे (चिखलठाण); महायुती-मंदा सरडे व शालन गुंड; अनुसूचित जाती-जमाती-महाविकास आघाडी-राजेंद्र उर्फ रामभाऊ भीमा कदम (उमरड); महायुती-बाळकृष्ण सोनवणे; इतर मागासवर्गीय गट-महाविकास आघाडी-दादासाहेब नामदेव पाटील (बिटरगाव); महायुती-रोहिदास माळी; भटक्या विमुक्त-महाविकास आघाडी-आमदार नारायण गोविंदराव पाटील(जेऊर); महायुती-अनिल केकान.