गेल्या चार दिवसांपासून पावसाचे बरसणे सुरू असल्यामुळे लातूरकरांचा जीव तूर्त भांडय़ात पडला आहे. पावसाने मुक्काम ठोकल्याने अनेकांना मनात लहानपणी घर करून असलेल्या पावसाच्या कवितांना उजाळा मिळू लागला आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरणाच्या परिसरात गेल्या २४ तासांत तब्बल ५५ मिमी पाऊस झाल्यामुळे धरणाच्या पाणीसाठय़ात चांगली वाढ होत असून, पाणीपातळी ६९ सेंटिमीटरने वाढली आहे. गुरुवारी सकाळी धरणाची पाणीपातळी ६२९.४५ मीटर, तर पाणीसाठा ३.०२ दशलक्ष घनमीटर वाढला. या पाण्यामुळे लातूरचा पुढच्या तीन महिन्यांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
गतवर्षी याच दिवशी धनेगाव धरणाची पाणीपातळी ६३३.७७ मीटर, तर पाणीसाठा २४.१९१ दलघमी होता. लातूर शहरालगत मांजरा नदीवर बांधलेल्या नागझरी बंधाऱ्यातील पाणीपातळीत वाढ होत असून गुरुवारी सकाळी १.३५ मीटर वाढ झाली. या जलाशयात ०.५४७ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. पाण्याचा वापर काटकसरीने केल्यास, तसेच आणखी पाऊस झाल्यास रेल्वेने पाणी आणण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो. या पावसाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला नसला, तरी किमान पुढचे दोन-तीन महिने तो सुटण्यास मदत झाली आहे.
बुधवारी सायंकाळी जिल्हाभर पावसाने बरसात केली. काही ठिकाणी रात्रभर भीजपाऊस झाला. या पावसामुळे जलयुक्त शिवार मोहिमेत झालेल्या बंधाऱ्यांत पाणी साठल्याने त्याचाही लाभ होत आहे. स्वयंसेवी संस्था व शासकीय यंत्रणेने केलेल्या कामातून ठिकठिकाणी चांगले पाणी साठले. लातूर तालुक्यात सर्वाधिक, तर सर्वात कमी पाऊस उदगीर तालुक्यात झाला. लातूर तालुक्याच्या तांदुळजा मंडळात ८५, लातूर शहर ४०, कासारखेडा ४०, बाभळगाव ३४, मुरूड ३६, औसा तालुक्यात बेलकुंड ३५, मातोळा ४९, भादा ३०, किल्लारी २८. रेणापूर तालुक्यात रेणापूर ६०, पोहरेगाव ५०, पानगाव ४५. अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद ३३, हडोळती २२, चाकूर शहर ३२, नळेगाव २९, शेळगाव ४४, मदनसुरी २५, औराद ३०, कासार बालकुंदा ३१ मिमी याप्रमाणे पाऊस झाला.
सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्हय़ात पडलेला पाऊस मिमीमध्ये, कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे : लातूर ३७.३८ (२८५.६६), औसा २३.५७ (२७२.७६), रेणापूर ४१.५० (३८२), उदगीर ५.७१ (३३६.१९), चाकूर २९ (२८५.८), अहमदपूर ११.६७ (२६८.६५), जळकोट ८.५० (३४२.५), निलंगा १७.१३ (२८६.०९), देवणी १२ (३६१.६२), शिरूर अनंतपाळ १० (२३४.९९), सरासरी १९.६५ (२९५.६३).
लातूरकरांची पाण्याची समस्या तूर्त दूर
पावसाचे बरसणे सुरू असल्यामुळे लातूरकरांचा जीव तूर्त भांडय़ात पडला आहे.
Written by दया ठोंबरे
Updated:
First published on: 11-09-2015 at 01:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Continue 4th day rain