कपाळी गंध अन् हातात टाळ, पण अंगात खाकी वर्दी.. इतर कोणत्याही सण-सोहळ्यांमध्ये एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याचे हे रूप दिसणार नाही. वारीच्या वाटेवर मात्र हे घडते. पालखीबरोबर बंदोबस्तावर असताना कर्तव्याची जाणीव निश्चित असते, पण सोहळ्यातील चैतन्याच्या अनुभूतीने पोलीस कर्मचारीही वारीमय होतो. खून, दरोडे, मारामाऱ्या अन् रोजचा गुन्हेगारांशी संबंध येत असल्याने बोलीमध्ये आलेला एक कठोरपणाही कुठेतरी गळून पडतो अन् वारीच्या वाटेवरील प्रत्येक जण त्यांच्यासाठी ‘माउली’ होतो.  पालखी सोहळ्याचे एक अंतर्गत व्यवस्थापन व शिस्त असते. त्यामुळे लाखो वारकरी बरोबर असतानाही सुनियोजितपणे पालखी सोहळा पुढे जात असतो. सोहळ्याबरोबर चालणाऱ्या वारकऱ्यांच्या िदडय़ांचेही स्वत:चे वेगळे नियोजन असते. या सर्वाचा परिणाम म्हणून या संपूर्ण सोहळ्याला एक शिस्त लागलेली असते. त्यामुळे सोहळ्याच्या अंतर्गत नियोजनामध्ये स्थानिक प्रशासन किंवा पोलिसांना काही करावे लागत नाही. मात्र हा सोहळा विनाअडथळा पंढरीला जावा, यासाठी करण्यात येणाऱ्या बाह्य़ नियोजनामध्ये या यंत्रणांचा महत्त्वाचा वाटा निश्चित असतो. त्यामुळेच वारकऱ्यांच्या अखंड भक्तिकल्लोळात पोलीस व प्रशासनाच्या िदडीलाही तितकेच महत्त्व आहे.
 पालखी सोहळा निघण्यापूर्वी महिनाभर सोहळ्याचे प्रमुख, पोलीस, प्रशासन यांची बैठक होते. सोहळ्याला विविध भागांत येणाऱ्या अडचणी मांडण्याबरोबर त्यांच्या सोडवणुकीबाबत निर्णय घेतले जातात. पालखी सोहळा सुरू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाचेही काम सुरू होते. पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणची स्वच्छता व प्रामुख्याने वारकऱ्यांसाठी पाण्याचे टँकर पुरविण्याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते. तलाठी, तहसीलदार, प्रांत ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतचे अधिकारी या नियोजनात असतात. काही शासकीय कर्मचारी प्रत्यक्षात सोहळ्यात असतात. रोजच्या फायलींच्या गराडय़ातून भक्तिमार्गाने चालणाऱ्यांची सेवा करण्याला कोणाचीही हरकत नसते.
 संपूर्ण पालखी मार्गावरील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची पाहणी करून या पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. पाण्यामध्ये आवश्यकतेनुसार शुद्धीकरणाची औषधे टाकली जातात. मुक्कामाच्या ठिकाणची स्वच्छता व औषधफवारणीही प्रामुख्याने केली जाते. पालखी मुक्कामी वेळोवेळी प्रशासनाकडून सोहळाप्रमुखांशी चर्चा केली जाते. एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात किंवा एका जिल्ह्य़ातून दुसऱ्या जिल्ह्य़ात पालखी प्रवेश करताना पालख्यांचे स्वागत होते. या ठिकाणी दोन्ही जिल्ह्य़ांचे प्रशासनातील प्रतिनिधी असतात. पालखीचा प्रवेश होत असलेल्या जिल्ह्य़ातील अधिकाऱ्यांकडे आधीच्या जिल्ह्य़ातील अधिकारी कार्यभार सोपवितात.
 सोहळ्यामध्ये पोलिसांच्या कामांची नियोजनबद्ध आखणी असते. िदडीतील भोजनव्यवस्थेतील वाहने पालखीच्या पुढे काढणे, इतर वाहतुकीचे नियोजन करणे व अनुचित प्रकार रोखण्यासाठी ही यंत्रणा काम करते. पालखी रथासोबत पोलिसांचे एक पथक दिले जाते. त्यात महिला कर्मचाऱ्यांचाही सहभाग असतो. गर्दीच्या ठिकाणी चोरटय़ांचा बंदोबस्त करणे, गर्दीवर नियंत्रण करण्याची कामे केली जातात. मात्र, वारीच्या वाटेवर प्रत्येक वेळी भाविकांची गर्दी नसते. त्या वेळी वारकऱ्यांचा हा निखळ भक्तिकल्लोळ पाहून पोलीसही त्यात रममान होतात. टाळ-मृदंगाच्या तालावर ठेका धरण्यापासून वारकऱ्यांसमवेत फुगडीही घातली जाते. वर्दीवर असताना एरवी कुणाचा झेंडा न घेणाऱ्या कर्मचाऱ्याला सोहळ्यात भागवत धर्माची पताका खांद्यावर घेण्यातून आगळेच चैतन्य मिळते. कर्तव्य बजावत असतानाही भक्तिमार्गावर चालण्याचे समाधान हा चैतन्यसोहळाच देऊ शकतो!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा