पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला आवश्यकतेनुसार मनुष्यबळ पुरवठा करणारे रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस ॲड सिस्टम्स प्रा. लि., पुणे यांचा ठेका रद्द करण्यात आला आहे. भाविकांना धक्काबुक्की करणे, गणवेश परिधान न करणे, तपासणी न करता मोबाइलसह मंदिरात प्रवेश देणे अशा अनेक बाबींमुळे करारातील अटी-शर्तींचा भंग झाल्याने ठेका रद्द केल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला कुशल, अर्धकुशल व अकुशल मनुष्यबळ आवश्यकतेनुसार नियुक्त करणे गरजेचे असते. त्यानुसार पुण्यातील रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस ॲड सिस्टम्स प्रा. लि. यांची ई निविदा मंजूर होऊन दि. ४ जुलै २४ रोजी करारनामा करण्यात आला होता. मात्र, त्यांनी नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत अनेक लेखी तक्रारी समितीला आल्या. याबाबत समितीने वारंवार नोटीस देऊन खुलासा मागितला. मात्र, त्यात कोणतीही सुधारणा दिसून आली नाही. मंदिर समितीच्या १० डिसेंबर २४ रोजीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. यात संबंधित ठेकेदारास अंतिम नोटीस देऊन खुलासा मागितला होता. मात्र, त्यात सुधारणा झाली नाही.
हेही वाचा >>>पाचगणीत हॉटेलमध्ये नृत्यांगना आणि वीस ग्राहकांवर कारवाई
रक्षक कंपनीने नियुक्त केलेले कर्मचारी हे भाविक भक्तांना धक्काबुक्की करतात, त्यांना ढकलून देतात. भाविकांशी नम्रतेने न वागणे, आयकार्ड व गणवेश परिधान न करणे, नेमून दिलेली सेवा व्यवस्थित पार न पडणे, मंदिरात प्रवेश करणाऱ्या गेटवर भाविकांची तपासणी न करता मोबाइलसह मंदिरात प्रवेश देऊन करारातील अटी-शर्तीचा भंग करणे, २५ पैकी फक्त २ माजी सैनिक नियुक्त करून करारातील अटीचा भंग केला. कर्मचाऱ्यांना पेमेंट स्लिप न देणे, कर्मचाऱ्यांना चांगले प्रशिक्षण न देणे, सुरक्षा विभागाकडील कर्मचारी कंपनीचे बोधचिन्ह असलेला गणवेश वापरत नाहीत. सेवेच्या ठिकाणी मोबाइल वापरणे व इतर आनुषंगिक गैरवर्तन करीत असल्याच्या बाबी अनेक वेळा निदर्शनास आलेल्या आहेत. सेवा पुरवठा कालावधीच्या एक वर्षातील ६ महिने होऊनदेखील सुधारणा नाही आणि यापुढेदेखील सुधारणा होईल, असे वरील कारणास्तव वाटत नाही. तसेच सदरचा करार यापुढे सुरू ठेवल्यास, मंदिर समितीची प्रतिमा जनसामान्यांत मलिन होईल. त्याचा भाविकांच्या सोयी-सुविधेवर परिणाम होईल. त्यामुळे करार रद्द करणे क्रमप्राप्त झाले होते, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी या वेळी सांगितले.