राज्यभरात विविध ठिकाणी स्थानिक राजकीय वादांमुळे कंत्राटदारांना विकासकामे करण्यात अडचणी येत असल्याची तक्रार राज्यभरातील कंत्राटदारांच्या दोन संघटनांकडून करण्यात आली आहे. यासाठी कंत्राटदारांच्या संघटनांकडून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. कंत्राटदारांना स्थानिक राजकारण्यांकडून कामात अडथळा, धमक्या व खंडणी मागितली जात असल्याचा आरोप करतानाच यावर कारवाई न झाल्यास फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कामं बंद करणार असल्याचा इशाराच या संघटनांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“स्थानिक विरोधकांकडून कंत्राटदारांना मारहाण”

Maharashtra State Contractors Association अर्थात MSCA व State Engineers Association अर्थात SEA या दोन संघटनांकडून राज्याच्या प्रमुखांना पत्राद्वारे कंत्राटदारांच्या व्यथा कळवण्यात आल्या आहेत. “महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात हीच परिस्थिती दिसत आहे. सत्ताधाऱ्यांचे विरोधी पक्ष व स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी, राजकीय नेते विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे आणतात. यासाठी शारिरीक हिंसाही केली जाते. कंत्राटदारांकडून खंडणी उकळली जाते”, असा गंभीर दावा या पत्रामध्ये करण्यात आला आहे.

“स्थानिक पातळीवरच्या या गुंडांना केवळ प्रशासकीय अधिकारी आवर घालू शकत नाहीत. कंत्राटदारांना मारहाण करून त्यांना धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत. कंत्राटदारांनी विरोध केल्यास त्यांना धमकावल्याचे प्रकार राज्यभर घडत आहेत. आधी ते कंत्राटदाराविरोधात तक्रार दाखल करतात आणि नंतर त्याच्याकडून खंडणीची मागणी करतात”, असा आरोपही पत्रात केला आहे. ३ फेब्रुवारी रोजी हे पत्र पाठवण्यात आल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात नमूद केलं आहे.

“आमदार, खासदारांना विकासनिधी मिळतो, पण…”

“सत्ताधारी आमदार-खासदार मोठ्या प्रमाणावर विकासनिधी मंजूर करून घेत असतात. पण स्थानिक पातळीवर ही विकासकामे राबवताना विरोधात असणारे राजकीय गट ही कामं होऊ देत नाहीत. यासाठी हे सर्व गट कंत्राटदाराविरोधात एकत्र येतात. त्यांना मारहाण करतात, शिवीगाळ करतात. “, असंही पत्रात म्हटलं आहे. “सरकारकडून विविध विभागांसाठीच्या विकासकामांचे आदेश काढले जातात. पण राजकीय वादामुळे प्रकल्पांचं नुकसानही होतंय आणि ते पूर्ण करण्यास विलंबही लागतोय. प्रशासकीय अधिकारी याकडे फक्त दुर्लक्ष करत आहेत. आणखी धमक्यांच्या भीतीने कंत्राटदार तक्रारी दाखल करण्यासाठी पुढे येत नाहीत”, अशी व्यथा MSCA व SEA या संघटनांचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मांडली.

गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणामुळे महायुती तुटणार? भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

“आता कंत्राटदारांसमोर काम बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही”, अशी भूमिका मिलिंद भोसले यांनी मांडली आहे. “राज्य सरकार व सरकारमधील मंत्र्यांनी या प्रकाराकडे तातडीने लक्ष घालून आवश्यक त्या उपाययोजना करायला हव्यात. कंत्राटदारांवरील अशा हिंसक हल्ल्यांना रोखण्यासाठी कठोर कायदा पारित व्हायला हवा”, अशी अपेक्षा या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारणा केली असता या तक्रारींचा पूर्ण आढावा घेऊन, तसेच प्रत्यक्ष परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contractors association in maharashtra writes cm eknath shinde on threatening from political opposition pmw
Show comments