पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विदर्भाचा कल अद्याप स्पष्ट झालेला नसला तरी डॉ. सदानंद मोरे व भारत सासणे या दोन नावांना विदर्भातील मतदारांची प्रामुख्याने पसंती राहणार असल्याचे प्राथमिक चित्र आहे. विदर्भ साहित्य संघाने या निवडणुकीत कुणा एकाला पाठिंबा न दिल्यास डॉ. मोरेंविरुद्ध भारत सासणे या दोघांमध्ये विदर्भातील मतांसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या गुमान येथे फेब्रुवारी २०१५ मध्ये साहित्य संमेलन होत असून संत साहित्याचे अभ्यासक डॉ अशोक कामत, डॉ. सदानंद मोरे, कादंबरीकार भारत सासणे व महानुभाव साहित्याचे अभ्यासक पुरुषोत्तम नागपुरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या चार उमेदवारांमध्ये अध्यक्षपदासाठी लढत होणार असली तरी विदर्भातील मतदारांचा कल आजच्या घडीला डॉ. सदानंद मोरे व कादंबरीकार भारत सासणे या दोघांकडे अधिक राहण्याची शक्यता आहे. कथा व कादंबरी विश्वाशी जवळीक असलेली नागपुरातील मान्यवर नावे भारत सासणे यांच्या समर्थनार्थ उघडपणे समोर आली आहेत. सासणे यांच्या विजयासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून मतदारांपर्यंत तशा प्रकारचे निरोप पोहोचविणे सुरू झाले आहे. दुसरीकडे. डॉ. सदानंद मोरे यांच्या साहित्य क्षेत्रातील कामाबद्दल आस्था असलेला वर्गही विदर्भातील मतदारांमध्ये असून त्यातील काही जण आपण डॉ. मोरे यांनाच मतदान करणार असल्याचे सांगत आहेत. प्रा पुरुषोत्तम नागपुरे यांचे महानुभाव साहित्यातील काम लक्षात घेतले तरी अध्यक्षपदासाठी इतर दोघांच्या तुलनेत ते अद्याप पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांची विदर्भातील संख्या १७५ आहे. विदर्भातील उमेदवारांमध्ये कितीही मतांतरे असली तरी प्रत्येक निवडणुकीत साधारणत: विदर्भ साहित्य संघाने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला विदर्भातून अंतिम मतदान होते. गेल्या वेळी वि. सा. संघाने प्रा. प्रभा गणोरकर यांना पाठिंबा दिला होता व त्यानुसार त्यांना विदर्भातून मतेसुद्धा प्राप्त झाली होती. मात्र, या वर्षी असा कोणताही निरोप विदर्भातील मतदारांपर्यंत वि. सा. संघाकडून अद्याप पोहोचलेला नाही. अनेक मतदारांपर्यंत आजच्या घडीला मतपत्रिकाही पोहोचलेल्या नसल्या तरी आपापला कल मतदार बोलून दाखवित आहेत. नेहमीप्रमाणे, वि. सा. संघ कुणाला तरी पाठिंबा देईल, अशी अपेक्षा अद्याप मतदार बाळगून आहेत.
‘अद्याप काहीही ठरलेले नाही’
वि. सा. संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी अद्याप या प्रकरणी काहीही ठरले नसल्याचे सांगितले. ‘‘डॉ. अशोक कामत, डॉ. सदानंद मोरे व भारत सासणे हे तिघेही तुल्यबळ उमेदवार आहेत, तर पुरुषोत्तम नागपुरे यांचा विशिष्ट पंथाशी संबंध आहे. प्रा. प्रभा गणोरकर या चांगल्या लेखिका व समीक्षक असल्याने व विदर्भातील महिला उमेदवार असल्याने मागील वेळी वि. सा. संघ त्यांच्या पाठीशी उभा राहिला होता. यावेळी अजून काहीही ठरलेले नाही. तिन्ही उमेदवारांमध्ये डावा-उजवा करणे कठीण आहे व कोणाला निवडून द्यायचे हा मतदारांचा स्वतंत्र निर्णय राहणार आहे,’’ असे म्हैसाळकर यांनी स्पष्ट केले.