कोलकात्यातील शारदा चीटफंड घोटाळ्याच्या सूत्रधारांमध्ये नाव आल्याने वादग्रस्त ठरलेल्या आसामातील हायप्रोफाईल ‘मिडिया बॅरन’ मनोरंजना सिंग यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील दसरा महोत्सवातील हजेरी राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. रविवारच्या कार्यक्रमात मनोरंजना सिंग पूर्णवेळ उपस्थित होत्या. त्यांना अगदी समोरच्या खास आसनावर स्थान देण्यात आले होते. त्यांच्या बाजूला भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी संघाच्या गणवेशात बसले होते.
शारदा चीटफंड घोटाळ्याचा भंडाफोड चीटफंड कंपनीचे माजी अध्यक्ष सुदीप्ता सेन यांनी सीबीआयला लिहिलेल्या १८ पानी पत्रामुळे झाला होता. यात त्यांनी कंपनीतील घोटाळ्यासाठी जबाबदार असलेल्यांची नावे नमूद केली होती. मनोरंजना सिंग यांच्या आग्रहास्तव आपण केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम यांना १ कोटी रुपयांपेक्षा अधिक राशी दिल्याचा उल्लेखही पत्रात करण्यात आल्याने मनोरंजना सिंग यांचे नाव घोटाळ्यात गुंतले गेले.  
मनोरंजना सिंग या काँग्रेसचे मातब्बर नेते मातंग सिंग यांच्या घटस्फोटित पत्नी आहेत. मातंग सिंग हे पी.व्ही. नरसिंहराव यांचे उजवे हात होते. केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश करण्यात आला होता. गुवाहाटीत एक टीव्ही वाहिनी काढण्यासाठी शारदा चीटफंडला ४२ कोटी रुपये मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचाही आरोप मनोरंजना सिंग यांच्यावर आहे.
कंपनी लॉ बोर्डाकडे दाखल केलेल्या एका याचिकेत मनोरंजना सिंग यांनी उद्योगपती जिंदल यांच्यावर मातंग सिंग यांच्यासाठी १२७ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती.
मनोरंजना सिंग यांच्या न्यायालयीन खटल्यात पी. चिदंबरम यांच्या पत्नी वकिली करीत आहेत. काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या मनोरंजना सिंग यांनी अचानक संघाच्या विजयादशमी सोहळ्यात उपस्थिती लावण्याचे कारण अज्ञात आहे. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी भाजप आणि संघाच्या काही नेत्यांची गाठभेट घेतली.
मनोरंजना सिंग यांच्यावर एखादी नवी राजकीय जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.