भाजपा पुरस्कृत अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांच्या मोटारीवर काही अज्ञात तरूणांनी काळे ऑईल टाकून ‘वंदे मातरम्, भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील रिधोरे गावाजवळ मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला.
आमदार परिचारक हे आपल्या मोटारीतून पंढरपूरहून बार्शी येथे एका कार्यक्रमासाठी निघाले होते. वाटेत रिधोरे येथे एका तरूणाने दुचाकी आडवी पाडून परिचारक यांची मोटार अडविली. त्यानंतर लगेचच मोटारीवर समोरच्या काचेवर काळे ऑईल टाकले. या कृत्यामध्ये अन्य काही तरूणही सहभागी झाले होते. यावेळी ‘वंदे मातरम्, भारत माता की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या.
तीन वर्षापूर्वी आमदार परिचारक यांनी भारतीय लष्करी सैनिकांच्या कुटुंबीयांबद्दल अवमानजनक वक्तव्य केले होते. त्यावेळी माजी सैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. परिचारक यांच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली होती. तेव्हा परिचारक यांना जाहीर माफी मागावी लागली होती. परंतु त्यांना विधिमंडळातून दीड वर्ष निलंबित करण्यात आले होते.
सैनिकांविषयी आमदार परिचारक यांनी केलेल्या अपमानजनक वक्तव्यामुळेच आज तीन वर्षांनी पुन्हा त्यांच्या मोटारीवर काळे ऑईल टाकून राग व्यक्त करण्यात आल्याचे सांगितले जाते. सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा परिचारक यांची उमेदवारी घोषित केली आहे. हीसुध्दा आजच्या घटनेची पार्श्वभूमी मानली जात आहे.
काय होतं परिचारक यांचं वादग्रस्त वक्तव्य?
‘पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला, त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे,’ असे वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांना टीकेला समोरे जावे लागले होते. त्यामुळे त्यांना विधान परिषदेतून दीड वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते.