शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी न्यायाधीशांवर बोलताना आक्षेपार्ह विधान केलंय. लिव्ह इन रिलेशनशीप अयोग न्याही, असं म्हणणाऱ्या न्यायाधीशांना त्या जागेवरून संपवले पाहिजे, असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलंय. मी हे बोलल्याने माझ्यावर गुन्हे दाखल होतील, काय गुन्हे दाखल करायचे ते करुदेत, असंही भिडे यांनी म्हटलं. ते राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये देखील वाईनची विक्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
संभाजी भिडे म्हणाले, “जेव्हा हा निर्णय झाला, तेव्हा कोणत्याही पक्षाचा एकसुद्धा मंत्री, आमदार ‘असा निर्णय करणार असेल तर मी आमदारकीवर, मंत्रीपदावर थुंकतो, तुमच्यात बसण्याचं पाप मी करणार नाही’, असं म्हणून बाहेर पडला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. धान्य कुजवून त्याच्यापासून दारू तयार करा असं सांगणारी मंडळी आम्हाला पूज्य असतात. आम्हाला राग येत नाही, संताप येत नाही.”
“असले न्यायाधीश त्या जागेवरून संपवले पाहिजे”
“लिव्ह इन रिलेशनशीप हा काय बेशरमपणा आहे. कसलं लिव्ह इन रिलेशनशीप? लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही असं म्हणणारी न्यायालये देखील वध्य आहेत. असले न्यायाधीश त्या जागेवरून संपवले पाहिजे. मी बोलतोय त्याचा मला चटका बसेल. माझ्यावर गुन्हे दाखल होतील. काय गुन्हे दाखल करायचे ते दाखल करुदेत. रामशास्त्री प्रभुणे यांनी भरसभेत सांगितलं की तुला देहांताशिवाय दुसरं शासन नाही,” असं संभाजी भिडे म्हटले.
व्हिडीओ पाहा :
“आपल्या लोकशाहीची अत्यंत गलिच्छ दिशेने वाटचाल सुरू”
“आपल्या लोकशाहीची अत्यंत गलिच्छ दिशेने वाटचाल सुरू आहे. ती थांबवणं आवश्यक आहे. ती ताकद छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची परंपरा तुम्हा आम्हाला देवो. ते नक्की आपल्याला ही ताकद देतील असा विश्वास आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
“त्यांनी जन्म घेतलेल्या आई-बापाची कूस बाटवली”
“समाज काही ऐकत नाही, लोक काही सुधारत नाहीत, लोक काही प्रतिसाद देत नाहीत असं बोलायचं नाही. समाजाला आपण दिशा द्यायची असते. आपण जगून दाखवायचं असतं. ज्या लोकशाहीनियुक्त राज्यकर्त्यांवर पुढच्या पिढ्यांना प्रकाश दाखवण्याची जबाबदारी आहे, त्यांनी असा बेशरम, राष्ट्रघातक, धर्मघातक, नीतीघातक, सर्वनाशक निर्णय घेऊन मोठं पाप केलं आहे. त्यांनी त्यांचं कुळ आणि जन्म घेतलेल्या आई-बापांची कूस बाटवलेली आहे. हे थांबलंच पाहिजे”, अशा शब्दांत संभाजी भिडे यांनी राज्य सरकारवर टीका केली.
“पंतप्रधानांनी देशात दारूबंदी करावी”
दरम्यान, यावेळी बोलताना संभाजी भिडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दारूबंदी करावी, अशी मागणी केली आहे. “मी कोश्यारींना म्हणणार आहे की हे मंत्रीमंडळ बरखास्त करून टाका. तुमचा अधिकार आहे तो. नरेंद्र मोदी सरकार खरोखर भगवंताची कृपा म्हणून मिळालं आहे आपल्याला. अतुलनीय. लालबहादूर शास्त्री जसे चांगले होते, तसेच हे आहेत. मी पंतप्रधानांचं मन जाणतो. त्यांनी खरोखर या देशातल्या दारूला कायमची तिलांजली देणारा ठराव लोकसभेत करून घटनेत दुरुस्ती करावी”, असं संभाजी भिडे यावेळी म्हणाले.
हेही वाचा : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडेंना कोर्टाचा दिलासा; अजामिनपात्र वॉरंट रद्द, जाणून घ्या प्रकरण
मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा?
“एक पाऊल स्वच्छतेच्या दिशेने, एक पाऊल प्रगतीच्या दिशेने.. पण हे पहिलं पाऊल सर्वनाशाच्या दिशेने पडलेलं आहे. या देशातली दारू संपली पाहिजे १०० टक्के. आपण दारूचा जर अशा पद्धतीने मुक्तसंचार होऊ देत असू, तर गांजाची शेती करण्याला आपण का आडवं जायचं? सर्रासपणे अफू, गांजाची शेती करून आपला महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापारातून पैसा मिळवू शकेल. हेसुद्धा करायला हरकत नाही असं म्हणणारा बेशरम समाज निर्माण होतोय. पण ते जमणार नाही. त्याच्याविरोधात आम्ही उभे राहणार आहोत”, असं ते म्हणाले.
आर. आर. आबा असते तर…
यावेळी बोलताना संभाजी भिडे यांनी दिवंगत आर. आर. आबा यांची आठवण काढली. “मला आठवण होते आर. आर. आबांची. डान्सबारचा मुद्दा होता. त्यांनी मंत्रीमंडळात सगळ्यांच्या विरोधात जाऊन डान्सबार बंदी केली. आज आर आर आबा असते, तर सगळ्यांच्या विरोधात जाऊन हा निर्णय होऊ दिला नसता. यातून नेमकं काय साधायचंय ते नेमकं कळत नाहीये. असे निर्णय झाल्यानंतर कुणाला राग येत नाहीये”, असं संभाजी भिडे म्हणाले.