लोकसत्ता प्रतिनिधी
नगर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप पक्षांतर्गत सूडबुद्धीच्या राजकारणामुळे ‘घरचे राहिले उपाशी अन् काँग्रेसवाले तुपाशी’ अशी अवस्था झाली आहे. भाजपमधील ओबीसी नेत्यांना संपवण्याचे पाप फडणवीस करत आहेत, असा आरोप शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नगरमध्ये बोलताना केला.
सुषमा अंधारे यांनी सिंदखेड राजा ते शिवाजी पार्क अशी ‘मातृतीर्थ ते शिवतीर्थ’ ही मुक्तसंवाद यात्रा सुरू केली आहे. १९ दिवसांपूर्वी सुरू झालेली ही यात्रा नगरमध्ये आली. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडे यांचे राजकारण संपवत आहेत. त्यांच्या त्रासामुळे तावडे, बावनकुळे पक्षात त्रस्त आहेत, परंतु तावडे त्यांच्या तावडीत सापडले नाहीत. बावनकुळे यांनी भाटगीरी करत त्यांच्याशी जुळून घेतले आहे. एकनाथ खडसे त्यांच्या जाचामुळे बाहेर पडले. पंकजा मुंडे यांच्याऐवजी अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मुंडे यांनी अन्याय सहन करू नये, अन्याय सहन करणारा अधिक जबाबदार असतो, त्यामुळे त्यांनी शिवसेनेत यावे असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
आणखी वाचा-‘देवेंद्र फडणवीस हुडी घालून भेटले होते का?’ अशोक चव्हाणांनी दिलं उत्तर; म्हणाले, “ते सगळं…”
पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला झाला, त्यावेळेस फडणवीस म्हणाले संयमाने बोललं पाहिजे. परंतु राणे पितापुत्रांची मुक्ताफळे, वाह्यात वक्तव्य जनक्षोभ आहे, त्यावेळेला गृहमंत्री असलेल्या फडणवीस यांना लोकशाहीची का आठवण होत नाही? राणे पितापुत्रांनी मराठा आंदोलकांबद्दल केलेली भाषा दुर्दैवी आहे. त्याविरोधात उमटलेली ती प्रतिक्रिया होती. या प्रतिक्रियेमुळे महाराष्ट्रात इतर ठिकाणी काहीही घडू शकते. महाराष्ट्रातील सौहार्दाचे वातावरण बिघडण्यास फडणवीस आणि त्यांची ब्रिगेड प्रयत्न करीत आहे.
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांचीही ईडी चौकशी करा, अशी मागणी केली आहे तसेच ५० खोके घेतल्याचे सिद्ध झाल्यास भांडी घासेल असे सांगितले, त्याकडे लक्ष वेधले असता सुषमा अंधारे म्हणाल्या, रामदास कदम यांना झंडू बाम लावल्याशिवाय त्यांना रडू कोसळत नाही आणि ते खोटेही बोलू शकत नाही, त्यांचे वक्तव्य सुमार आहे. भांडी घासण्याच्या त्यांच्या लायकीच्या कामाची त्यांना लवकर जाणीव झाली, असा टोलाही त्यांनी लगावला.
वांद्रे रिक्लेमेशनची जागा अंदानी समूहाला देण्यात आली, याकडे लक्ष वेधले असता सूषमा अंधारे म्हणाल्या, पंतप्रधान मोदी गरिबांना काही देत नाहीत, मात्र त्यांच्या मित्रांना सर्व काही देत आहेत. फडणवीस आणि त्यांच्या ब्रिगेडने गुजरातचे मुनीम म्हणून काम पाहावे ‘सब भूमी अदानी की’ अशा पद्धतीचे निर्णय होत आहेत.
फडणवीस यांच्यामुळे मराठा-ओबीसी वाद
यापूर्वी हिंदू-मुस्लिमांमध्ये भाजप दंगली घडून आणत होते, परंतु मुस्लिम समाजाच्या संयमामुळे या दंगली आता होत नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस व त्यांची ब्रिगेड मराठा व ओबीसी यांच्यामध्ये वाद लावून वातावरण बिघडवत आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय संसदेत होणार आहे परंतु शिंदे-फडणवीस-पवार वारंवार तारखा देऊन दिशाभूल करत आहेत. मराठा आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस खोटे बोलत आहेत. विधिमंडळाच्या ठराव करून संसदेकडे पाठवण्याची आवश्यकता आहे. ओबीसींवरही गंडातर आणले जात आहे. मराठा समाजाची ही दिशाभूल केली जात आहे. राणे पिता-पुत्रांची भाषा पाहता मराठा समाजाच्या भावनांशी फडणवीस यांनी खेळू नये असाही इशारा सुषमा अंधारे यांनी दिला.
जगताप-कर्डिले-विखे यांची मिलीभगत
नगर शहरात राजकीय नेत्यांची जमिनीची ‘ताबेमारी’ जोरात सुरू आहे. दहशतीने जागा बळकवल्या जात आहेत. जगताप-कर्डिले-विखे यांची यामध्ये मिलीभगत आहे. लोक दहशती खाली असल्यामुळे बोलत नाहीत. परंतु या विरोधात शिवसेना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. याशिवाय शेतीत बेकायदा मोबाईल टॉवर उभारले गेले आहेत. ठेकेदाराने शेतकऱ्यांना त्याचा मोबदला दिलेला नाही, असे ३०० अर्ज आले आहेत. ठेकेदाराचे लागे राजकीय लागेबांधे असल्यामुळे शेतकरी दहशतीखाली आहेत. राजकीय गॅंगवॉरमध्ये दोन शिवसैनिकांचा बळी पडला आहे, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.