नांदेड: जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी काँग्रेस पक्षाने एकच जिल्हाध्यक्ष नियुक्त करावा, अशी मागणी पक्षाच्या केंद्रीय नेत्यांकडे करण्यात आल्यानंतर त्यावरून नांदेड जिल्हा काँग्रेसमधील वाद समोर आला आहे. सध्याची दोन जिल्हाध्यक्षांची रचना कायम ठेवण्याची मागणी राहुल ब्रिगेडचे सक्रिय कार्यकर्ते संदीपकुमार देशमुख बारडकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे.

गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खातेही उघडता आले नव्हते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पक्षाची अशी गत प्रथमच झाली. निवडणुकीतील दारुण पराभवानंतर या पक्षामध्ये आता गळती सुरू झाली असून पक्षसंघटना निष्क्रिय झाल्याचे दिसत आहे. त्यातच पक्षाचे एक प्रभारी जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी एकच जिल्हाध्यक्ष नेमण्याची मागणी थेट दिल्लीतील नेत्यांकडे केल्यानंतर पक्षातील बी.आर.कदम यांच्या समर्थकांनी त्यास विरोध दर्शविला आहे.

माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या अखेरच्या काळात नांदेड उत्तर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळणार्‍या कदम यांची अचानक उचलबांगडी करून त्यांच्या जागी आपले समर्थक राजेश पावडे यांची वर्णी लावली होती. त्यावरूनही पक्षात वाद निर्माण झाला होता. पण या बदलास पक्षाच्या प्रभारींनी तातडीने स्थगिती दिल्यामुळे तो वाद तेथेच शमला. पण आता ‘एक जिल्हा, एक जिल्हाध्यक्ष’ असा सूर निघाल्याने पक्षातील नवा वाद समोर आला.

बेटमोगरेकर यांनी पक्षाच्या केंद्रीय नेत्यांकडे केलेली मागणी मुद्रित माध्यमांतून समोर आल्यानंतर त्यांच्या या मागणीला मुदखेड तालुक्यातून विरोध असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. याच तालुक्याच्या बारड येथील प्रा.संदीपकुमार देशमुख यांनी नांदेड जिल्ह्याची मोठी व्याप्ती विचारात घेता दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त करणे गरजेचे असल्याचे तसेच शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या संघटनेत तशीच रचना असल्याचे नमूद केले. जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष टिकवून ठेवण्याचे आवाहन पक्षाचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासमोर असताना त्यांच्याच निकटवर्तीयांनी एकच जिल्हाध्यक्ष नेमण्याची भूमिका मांडल्यामुळे पक्षातील दक्षिण विरुद्ध उत्तर हा वाद समोर आला.

जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार असलेले बेटमोगरेकर हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्याम दरक यांच्यासह दिल्लीला गेले असून सोमवारी त्यांनी पक्षाचे महासचिव वेणूगोपाल व इतर नेत्यांची भेट घेतली. काँग्रेसच्या तारांकित नेत्या खा.प्रियांका गांधी यांना संसदेच्या परिसरात भेटून बोलण्याची संधीही त्यांना मिळाली. प्रियांका यांना त्यांनी नांदेडला भेट देण्याची विनंती केली. त्यांच्या या कृतीचे एकीकडे स्वागत होत असताना दिल्लीमध्ये त्यांनी पक्षसंघटनेसंबंधात मांडलेल्या भूमिकेला सर्वांचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट झाले.

‘त्यांना’ जिल्हाध्यक्षपद दिले जाऊ नये

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली होती, त्यांना पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्त करण्यात येऊ नये, अशी सूचना संदीपकुमार देशमुख यांनी प्रदेशाध्यक्षांना पाठविलेल्या पत्रामध्ये केली आहे. जिल्ह्यामध्ये काँग्रेस व महाविकास आघाडीचा एकही आमदार नाही, ही बाब लक्षात घेता काँग्रेस पक्षाने ग्रामीण भागासाठी दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त केले तर त्यांच्या कार्यक्षेत्रातील पक्षसंघटन बळकट करता येईल, असे त्यांनी म्हटले आहे. अशोक चव्हाण यांना विरोध करण्याची धमक ज्यांच्यामध्ये आहे, त्यांनाच पक्ष संघटनेतील महत्त्वाची पदे देण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे.