शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातले वाघ म्हणून त्यांची ओळख आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी म्हणजेच २३ जानेवारीला विधीमंडळात लावलं जाणार आहे. अशात जे तैलचित्र समोर आलं आहे त्यावरून ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे गटाच्या आमदारांनी हे तैलचित्र आणखी चांगलं करता आलं असतं असं म्हटलं आहे. यावरून आता वाद पेटण्याची चिन्हं आहेत.
शिवसेना जून महिन्यात दुभंगली
शिवसेनेत जून महिन्यापासून दोन गट पडले आहेत. एवढंच काय पक्षचिन्ह आणि पक्षाचं नावही गोठवलं गेलं आहे. ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार हे चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगातही शिवसेना कुणाची? यावर युक्तिवाद झाला. त्यावेळी शिंदे गटाच्या वकिलांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्ष प्रमुख या पदावरच आक्षेप घेतला. हे पद बेकायदेशीर आहे असं शिंदे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगासमोर सांगितलं. आता या सगळ्या घडामोडी घडत असताना बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र विधीमंडळात लावलं जाणार आहे. मात्र त्यावर ठाकरे गटाच्या आमदारांनी आक्षेप घेतला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण
या सगळ्या वादानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण समोर आलं आहे. जे तैलचित्र समोर आलं आहे त्या तैलचित्रावरून कुणीही वाद निर्माण करू नये कारण ते तैलचित्र लावलं जाणं अद्याप निश्चित नाही. आम्ही तीन ते चार प्रकारची तैलचित्र नक्की केली आहे त्यातलं एक चित्र विधीमंडळात लावलं जाईल त्यामुळे कुणीही यावरून वाद निर्माण करू नये असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच १२ जानेवारीपर्यंत हे तैलचित्र कुठलं असेल याचा निर्णय घेतला जाईल असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा मुंबईत ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्या’त पावणेदोन महिन्यात दोन लाख रुग्णांची तपासणी!
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर येणार?
बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र विधीमंडळात लावण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघे एकाच मंचावर उपस्थित असतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत भाजपा नेते प्रवीण दरेकर यांना विचारलं असता त्यांनी म्हटलं आहे की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र विधीमंडळात लावण्याचा जो निर्णय घेतला आहे तो अतिशय चांगला निर्णय आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत. तसंच या कार्यक्रमाला जर उद्धव ठाकरे उपस्थित राहिले तर चांगलंच आहे” असंही दरेकर यांनी म्हटलं आहे.