अलिबाग : रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद निर्माण झाला असतांनाच, आता किल्ल्यावरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याची बाब समोर आली आहे. सीसीटिव्ही यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्वराज्याच्या राजधानीची सुरक्षा धोक्यात आली आहे.रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी असलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात पत्र लिहून ही मागणी केली आहे. त्यामुळे वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून नवा वाद उभा राहिला आहे.

इतिहास अभ्यासकांमध्ये या वाघ्या कुत्र्याच्या अख्यायिकेबाबत मतप्रवाह आहेत. त्यामुळे अभ्यासाअंती यासंदर्भातील निर्णय घेऊन असे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे. तर हात जोडतो, पायाही पडतो पण नवे वाद उकरून काढू नका असा सल्ला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावादावर बोलतांना दिला आहे. वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून राजकारण तापण्याची चिन्ह दिसत असतांनाच आता किल्ले रायगडावरील सुरक्षेसाठी बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा नादुरुस्त असल्याची बाब समोर आली आहे.

पुरातत्व विभागाकडून एकूण १५ ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बंसविण्यात आले होते. हे सर्व क्रॅमेरे सध्या बंद आहेत. महत्वाची बाब म्हणजे पाच वर्षाहून अधिक कारावधीपासून ही यंत्रणा बंद असल्याचे सांगितले जात आहे. त्त्यामुळे रायगडाची सुरक्षा धोक्यात आली आहे. २०११ साली वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून असाच वाद निर्माण झाला होता. तेव्हा एका सामाजिक संघटनेनी बळजबरीने घुसून वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढून दरीत ढकलून दिला होता. पुरातत्व विभागाने तो पुन्हा काढून बसविला होता. या घटनेनंतर रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळ परिसरात कायमस्वरुपी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सीसीटीव्ही यंत्रणाही बसविण्यात आली होती. मात्र गेली पाच वर्ष ती नादूरूस्त असल्याची बाब आता समोर आली आहे. त्यामुळे वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सीसीटिव्ही यंत्रणात तातडीने कार्यान्विय करण्यात यावी अशी मागणी शिवप्रमी संघटनांनी केली आहे. या विभागाचे अधिकारी राजेश दिवेकर यांची प्रतिक्रीया उपलब्ध होऊ शकली नाही.

रायगड हा नुसता दगडांचा किल्ला नसून, स्वराज्याची राजधानी आहे. मराठा साम्राज्याच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारा आणि तमाम भारतीयांसाठी श्रध्देचे आणि अभिमानाचे वारसास्थळ आहे. त्यामुळे रायगडाच्या सुरक्षेला प्राथमिकता देणे गरजेचे आहे. पुरातत्व विभागाने तातडीने सीसीटिव्ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करावी. प्रा. अंजय धनावडे, इतिहास संशोधक पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सीसीटिव्ही यंत्रणा तातडीने सुरु करण्याबाबत निर्देश दिले जातील. यंत्रणा लवकरच कार्यान्वित होईल. किशन जावळे, जिल्हाधिकारी रायगड</p>