सांगली : गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराचा गुरुवारी दुपारी इस्लामपुरात बाजारात धारदार हत्याराने खून करण्याचा प्रकार घडला. इस्लामपूर परिसरात गेल्या २४ तासांत हा दुसरा खून झाल्याने शहरात खळबळ माजली आहे.शहरात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आदी गुन्हे दाखल असलेल्या नितीन संजय पालकर (वय ३५) या सराईत गुन्हेगारावर आज दुपारी वाळवा बझार परिसरात धारदार हत्याराने वार करण्यात आले. यात तो गंभीर जखमी होऊन पडला होता. ही माहिती मिळताच उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमीला उप जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

पालकर वाळवा बझार परिसरात एका पान टपरीवर उभा राहिला असता अज्ञातांकडून त्याच्यावर हल्ला झाला. आज बाजाराचा दिवस असल्याने आणि रस्त्यावर विक्रेते व्यवसाय करत असताना गर्दीवेळीच हा हल्ला झाल्याने पळापळही झाली. हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. संशयितांना शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

गेल्या २४ तासांत इस्लामपूरमध्ये हा दुसरा खून आहे. बुधवारी पहाटे वाघवाडी फाटा येथील चौकामध्ये सौरभ राजेंद्र केर्लेकर (वय ३० रा. माळगल्ली) याच्यावर बॅटने हल्ला करून खून करण्यात आला. या खूनप्रकरणी अरविंद उर्फ राघू साटम (वय ३२ रा. शिवनगर) व किरण रामचंद्र सातपुते (वय ३५ मूळ गाव रेड, ता. शिराळा) या दोन संशयितांना पोलिसांनी मुंबईला पलायनाच्या प्रयत्नात असताना पेठ नाका येथे अटक केली. अनैतिक संबंधातून हा खून झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.