ऐन दिवाळीचा मुहूर्त चुकवल्यानंतर आता थंडी अवतरली असून, तिने अवघ्या महाराष्ट्राला हुडहुडी भरवली आहे. उत्तरेकडून येणारे शीत वारे आणि निरभ्र आकाश यामुळे सर्वच भागात रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा तब्बल ३ ते ८ अंशांनी खाली उतरले आहे. त्याचाच परिणाम म्हणून सोमवारी सकाळी नगर (७.४ अंश) व पुण्यासह (७.९ अंश) अनेक ठिकाणी या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली.    
विशेष म्हणजे रविवारपासून तीव्र बनलेल्या थंडीचा कडाका पुढेही दोन-तीन दिवस सोसावा लागणार आहे. महाराष्ट्रप्रमाणेच कर्नाटकच्या अंतर्गत भागातही थंडीची तीव्र लाट पसरली आहे. राज्यात विविध ठिकाणी सोमवारी सकाळी नोंदवले गेलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये), ते सरासरीपेक्षा किती कमी आहे हे कंसात दिले आहे- अहमदनगर ७.४ (-८), पुणे ७.९ (-६), सातारा १०.८ (-५), सांगली १३.६ (-३), कोल्हापूर १४.९ (-३), सोलापूर ११.३ (-६), नाशिक ८.३ (-५), जळगाव ८.३ (-७), मुंबई-कुलाबा २१ (-२), सांताक्रुझ १४.६ (-६), रत्नागिरी १६.५ (-५), अलिबाग १७.१ (-४), डहाणू १७.१ (-४), औरंगाबाद १२.४ (-२), परभणी ९.२ (-७), नागपूर ११.३ (-४), अकोला ११.५ (-५), अमरावती १३.२ (-४), वर्धा ११.७ (-५), यवतमाळ ८.६ (-९)
थंडी आत्ताच का अवतरली?
नोव्हेंबर महिन्यात थंडीला सुरुवात होते, पण या वेळी दिवाळी उशिरा येऊनही त्या काळात ढगांचे आच्छादन असल्याने थंडी अनुभवायला मिळाली नाही. मात्र, आता उत्तरेकडून थंड व कोरडे वारे येत आहेत. त्याचबरोबर आकाश निरभ्र आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्यामुळे तापमान खाली जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून बहुतांश ठिकाणी या हंगामतील नीचांकी तापमान नोंदवले गेले.
पुढे काय?
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ म्हणजे थंड वारे बाष्प घेऊन आले आहेत. त्यांचा परिणाम म्हणून तिथे हिमवृष्टी होण्याची शक्यता असते. ते पुढे गेले की थंडीची तीव्रता आणखी वाढते. त्यामुळे आता हे वारे पुढे सरकले की उत्तर भारतात व महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांसाठी थंडीचा कडाका कायम राहील किंवा त्यात आणखी वाढ होईल, असे पुणे वेधशाळेचे संचालक डॉ. पी.सी.एस. राव यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा