राज्यात दररोज ६० लाख लीटर दुधाचे अतिरिक्त उत्पादन होत असून, यामुळे सहकारी दूध संघ अडचणीत आले आहेत. यावर शासनाने तातडीने भरघोस आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी दि. ८ डिसेंबरपासून दूधसंकलन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्य सहकारी दूध संघ कृती समितीचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी दिली.
    पाटील यांनी सांगितले, की दुधाचे अतिरिक्त उत्पादन राज्यात होत असल्याने या व्यवसायापुढील अडचणी वाढल्या आहेत. अतिरिक्त दुधापासून भुकटी तयार करण्यात येत असली तरी त्याचे दर घसरले आहेत. बाजारात अतिरिक्त दुधाला उठाव नाही. तसेच दूध पावडरचे दर ३०० रुपयांवरून १५१ रुपयांपर्यंत खाली आला आहे.
    राज्यात दूध उत्पादकांची संख्या तीस लाख असून १४० सहकारी संस्थांच्या माध्यमातून दररोज सुमारे १ कोटी १० लाख लीटर दूधसंकलन केले जाते. यापैकी ५० लाख लीटर दुधाची विक्री होत असून ६० लाख लीटर दूध अतिरिक्त ठरत आहे. दूध उत्पादकांना उत्पादन खर्चाशी निगडित दरही देणे परवडत नाही. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दि. ४ डिसेंबर रोजी इंदापूर तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात येणार असून, त्या ठिकाणी दूध ओतण्याचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा