नितीन बोंबाडे

निसर्गपूजक आदिवासींच्या पारंपरिक दिवाळी उत्सवावर करोनाचा फारसा प्रभाव दिसत नाही. परंपरा आणि संस्कृती म्हणून दिवाळी सणाला आदिवासींच्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. आदिवासी पाडय़ांवर आजही  बारस, तेरस, चावदस आणि पुनम अशी चार दिवस चालणारी पारंपरिक दिवाळी मोठय़ा उत्साहात साजरी केली जाते. यावेळी ‘कनसरी, नारायण, हिमाय, वरुण, चढोबा, वाघ्या, असग देवहो सणासुखाला नांगजोस’ अशी प्रार्थना करून देवांना सुखात व अडचणीच्या काळात पाठीशी उभे राहण्याची करुणा भाकली जाते.

शेण मातीने सारवलेल्या घरांच्या भिंती सजवून घराला लावलेल्या गोवऱ्यांच्या दिवटय़ांनी घर उजळवण्याची परंपरा आहे. या घरांना पणत्या किंवा कंदील नसतात. घरातील भिंतीवर या परंपरांच्या जोडीला निसर्गाशी जवळीक साधत जमिनीवर सांडलेली फुले किंवा आजूबाजूची रानटी फुले वापरून रांगोळी सजवली जाते.

वाघबारसपासून सुरू होणारी आदिवासींची दिवाळी परंपरेनुसार प्रत्येक आदिवासी गावाच्या सीमेवर वाघ देवाचे दगडी मूर्तीची स्थापना करतो. वसुबारस अर्थात वाघबारसच्या निमित्ताने दिवाळीच्या पहिल्या दिवशी सर्व आदिवासी बांधव एकत्र येऊन वाघ देवाची पूजा करतात. वाघ देवतेबरोबर साप, सूर्य, चंद्र, मोर आदींच्या मूर्तीची देखील पूजा केली जाते. प्रथम शेतातील नवीन पीक चवळी, वालका, कोहला, नागली, तांदूळ देवाला वाहिले जातात. शेतात येणाऱ्या नवीन पिकांसोबत नैवेद्य म्हणून कोंबडी आणि बोकडांचा बळी दिला जातो. या वेळी वाघ देवाचे स्मरण करून ‘जंगलात फिरताना रक्षण कर कुठलीही इजा करू नको’ अशी प्रार्थना केली जाते.

वाघबारशीनंतर तेरस, चवदस आणि पुनम असे दिवस येतात. या दिवसांत घरातील मोठी माणसे वरगना देव, कुल देव काढून दुधाने अथवा तांदुळाच्या पाण्याने धुतले जातात. तसेच देवांची टोपली शेणाने सारवली जाते. हिरवा, हिमाय, नारन, बरान या देवांना शेंदूर लावला जातो. गाय, वागुल ला शेंदुर लावतात. घर लाल माती शेणाने सारवतात.

आदिवासींची दिवाळी चार दिवस असते. आदिवासी दिवाळीचा पहिला दिवस ‘चावदस’ दिवसापासून सुरू होतो. पण काही भागात आता तारखा बदललेल्या दिसतात.

‘पहिला दिवस’ : पहिला दिवशी घराला बेरी केल्या जातात. शेणाचे गोवऱ्या दरवाज्या जवळ लावून त्यावर मोखोलीची फुले लावयाची, तांदळाच्या पिठापासून हाताचे ठसे उमटवायचे. या दिवशी पहाटे लवकर उठून आंघोळी करतात. त्यानंतर आपल्या ढोरांच्या (गुरे)शिंगांना लाल गेरू लावला जातो. काही गावांत ढोरांची दिवाळी उडविली जाते. गोठय़ात, शेनकईत व खळ्यात औषधी ‘कडू चीराड’ ठेवली जातात व चीराडाचे दोन भाग करून त्यापासून पणत्या तयार करून त्या लावल्या जातात. यानंतर सर्व देवांना नारळ दिवे लावतात. चवळी नारळ, वालुक, करांदे, करवेली, गुरकोहला, साखर कोहला पुजतात. वालुक, पीठ, साखर टाकून या दिवशी ‘गोड भाकर’ परिवारा सोबत खाल्ली जाते. जी भाकर पीठ, वालुक(गावठी ककडम्ी) चवळी, साखर यापासून बनवतात. याशिवाय ‘चवली व करांदे हे सोबत खाण्याचा कार्यक्रम असतो अशी माहिती आदिवासी अभ्यासक सुशिल. कुवर यांनी दिली.

दुसरा व तिसरा दिवस :

आदिवासी तरुण व तरुणी तारपकऱ्याच्या चालीवर तारपा नाचायला आपल्या पाडात निघतात. आणि दोन दिवस आपल्या परिसरात ‘डुहूरली’ करून बेधुंद नाचतात. गावदेव झाल्यानंतर खळ्याचा देव झाल्यानंतरच इतर संसारिक बाबींना मुभा मिळते. तत्पुर्वी आदिवासींमध्ये लग्नाचा शब्द पण तोंडी घेतला जात नाही. गावदेवांनंतर खळ्याचा देव केला जातो. दिवाळीच्या पूजेआधी आदिवासी कुटुंब शेतीची कडक पाळ करतात. कोथिंबीर, कोहला, काकडी, चवळी, ऊस, मुळा, कोंबडी, ताडी यांचा कडक पाळ केला जातो. घरातील मुख्य स्त्री त्यादिवशी उपवास  करते. भगत परवानगी देतो. तेव्हाच पाळ सोडला जातो. त्यामुळे या दिवाळीच्या सणाचे आणि आदिवासी संस्कृतीचे नाते जडले आहे.

लग्नसराईला सुरुवात

खळ्याच्या देव पुजल्यानंतरच  लग्नाचा व्यवहार केला जातो. दुसऱ्या दिवशी चायची किंवा कोहरेलोचे पानात काकडीच्या सावेल्या बाफल्या जातात. तसेच चवळी बाफतात. संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसवून त्या हातामध्ये देऊन एकत्रपणे खाण्याचा हा उत्सव असतो. तारपकरी आपल्या तारप्यावर वेगवेगळे चाली वाजवून घोरकाठीच्या तालावर फार मजा आणतो. प्रत्येक चाल्याचा नाच वेगवेगळा असतो. हे चाले वेगवेगळा नावाने परिचित आहेत. बायांचा, देवांचा, रानोडी, टाल्यांचा, चवलेचा, जोडय़ांचा, नवऱ्यांचा, (मोराचा) मुऱ्हा, ऊसल्या, सलातेचा, बदक्या, लावरी, थापडीचा, लोखीचा चाला म्हाताऱ्याचा उसळयाचा चाला आदींचा समावेश आहे.

Story img Loader