महाराष्ट्रात करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज (१० डिसेंबर) राज्यात नव्याने ७ रूग्ण आढळले आहेत. यात एका ३ वर्षीय चिमुकलीचाही समावेश आहे. याशिवाय यातील ४ जणांनी करोना विरोधी लसीचे दोन्हीही डोस घेतलेले होते, तर एकाने लसीचा एक डोस घेतलेला होता. ७ पैकी ४ रूग्णांना कोणतीही लक्षणं आढळलेली नाहीत, इतरांना सौम्य लक्षणं आहेत.
राज्यातील नव्याने आढळलेल्या ७ रूग्णांपैकी ३ रूग्ण मुंबईतील, तर ४ रूग्ण पिंपरी चिंचवड भागातील आहेत. यासह आता राज्यात एकूण ओमायक्रॉन बाधित रूग्णांची संख्या १७ वर पोहचली आहे.
यातील एक रूग्ण मुंबईतील धारावी झोपडपट्टीतील आहे. त्यामुळे दाटीवाटीच्या या परिसरातील संसर्गाचा धोका वाढला आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हा रूग्ण ४ डिसेंबर रोजी तांझानियावरून मुंबईत आला होता. विमानतळावर करण्यात येणाऱ्या करोना चाचणीत तो पॉझिटीव्ह आढळला. यानंतर त्याचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले होते. हा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आल्यानं या रूग्णाला मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा : राज्यात नवीन निर्बंध लागणार का? राजेश टोपे यांचं जालन्यात मोठं विधान
राज्यात कुठे किती ओमायक्रॉन विषाणू बाधित रूग्ण?
राज्यातील पहिला ओमायक्रॉन रूग्ण कल्याण डोंबिवलीत आढळला होता. यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये ६ आणि पुण्यात १ ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळले. यानंतर ६ डिसेंबरला मुंबईत २ जणांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. आता पुन्हा १० डिसेंबरला मुंबईत ३ आणि पिंपरी चिंचवडमध्ये ४ रूग्ण आढळले. यासह राज्यात एकूण १७ ओमायक्रॉन रूग्ण झाले आहेत. यातील एक रूग्ण उपचारानंतर बरा झाला आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर या रूग्णाला रूग्णालयातून सोडण्यात आलं. त्याला पुढील ७ दिवस गृह विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.