निखिल मेस्त्री

पालघर जिल्ह्यातील वाडा येथे राहणाऱ्या एका अत्यवस्थ रुग्णाने विक्रमगड येथील रिवेरा समर्पित करोना उपचार रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत रुग्णाच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाडा येथील हा ३८ वर्षीय रुग्ण करोनाबधित असून वाड्यातील पोशेरी उपचार केंद्रामध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र, तो अत्यवस्थ झाल्याने त्याला अतिदक्षता कक्षात उपचाराची आवश्यकता होती. त्याला शनिवारी रात्री विक्रमगड येथील रिव्हेरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी सकाळच्या सुमारास लघुशंकेला जात असल्याचे येथील कर्मचाऱ्यांना सांगत तो स्वच्छतागृहाकडे न जाता थेट रिव्हेरा रुग्णालयाच्या गच्चीवर गेला. तिथून त्याने रुग्णालयाच्या मागच्या बाजूला उडी घेतली. तिथे तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याला ही घटना समजल्यानंतर त्याने लागेचच रुग्णालयाच्या डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांनी ही बाब सांगितली.

रुग्णाने गच्चीवरुन उडी मारल्याचे कळताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावाधाव करून त्याला पुन्हा रुग्णालयात आणून तातडीचे उपचार सुरू केले. तातडीच्या उपचारांमुळे संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर असली तरी त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरनी सांगितले. त्याचबरोबर अधिक उपचारांसाठी त्याला मुंबई येथे हलविण्यात येणार असल्याची माहितीही डॉक्टरांनी यावेळी दिली.