राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून ही रुग्णवाढ ठराविक जिल्ह्यापर्यंत मर्यादित असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे जनता दरबार उपक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये ओमायक्रॉन या व्हायरसचे व्हेरीएंट आढळून येत आहेत, त्यामुळे राज्यात अद्याप कोणताही नवीन व्हायरस आढळून आलेला नाही, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी ती मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या मर्यादित क्षेत्रात वाढत आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी दर हा आजच्या दिवसाला ४० टक्क्यांवर गेल्यामुळे या रुग्णवाढीकडे आरोग्य विभाग लक्ष देऊन आहे. राज्यात रुग्णवाढ जरी होत असली तरी रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याची टक्केवारी ही दोन ते तीन टक्के इतकीच असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.
या रुग्णवाढीमुळे आरोग्य विभाग पुन्हा सतर्क झाला असून ‘हर घर दस्तक’ या सूचनेप्रमाणे आशा वर्कर आणि आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत घरोघरी जाऊन लसीकरणाची माहिती घेऊन लसीकरणाचे प्रमाण वाढवत आहोत, असेही राजेश टोपे म्हणाले.
राज्यात शाळा सुरु झाल्यामुळे १२ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण झाले नसल्यास ते पूर्ण करून घेण्याच्या सूचना पालकांना तसेच शिक्षकांना करण्यात येत आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहनही राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. याशिवाय खबरदारी म्हणून राज्यात टेस्टींगचे प्रमाण वाढविण्यात आले आहे, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.