राज्य शासन करोनाची तिसरी लाट आटोक्यात यावी, यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून प्रयत्न करत आहे. असं असताना नांदेड जिल्ह्यातील कंधारच्या बालविकास प्रकल्प कार्यालयाने मात्र शासनाच्या नियमावलीलाच तिलांजली दिल्याचे सोमवारी (१० जानेवारी) पाहायला मिळाले.
राज्य शासन आणि नांदेड जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वेगवेगळे निर्बंध लावले आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून रात्री संचारबंदी, तर दिवसा जमावबंदी असे आदेश लागू केलेले आहेत. राज्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्वच शाळा बंद आहेत; परंतु कंधारच्या बालविकास प्रकल्प कार्यालयाने एका अंगणवाडी संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील अंगणवाडी कर्मचार्यांना सोमवारी मोबाईल परत घेण्याच्या नावाखाली कार्यालयात बोलावले.
“कंधार बालविकास प्रकल्प कार्यालयात ३०० ते ४०० अंगणवाडी कर्मचारी”
यावेळी एका बंदिस्त असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील बालविकास प्रकल्प कार्यालयात जवळपास ३०० ते ४०० अंगणवाडी कर्मचारी एकत्र जमले. विशेष म्हणजे यातील काही कर्मचार्यांच्या तोंडावर मास्क नसल्याचेही पाहायला मिळाले. दरम्यान बालविकास प्रकल्प अधिकारी यांनीही यावेळी करोना नियमावलीचे कुठलेही भान न ठेवता तेथे उपस्थित कर्मचार्यांना मार्गदर्शन केल्याचेही सांगण्यात आले.
हेही वाचा : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात ‘हे’ नवे निर्बंध लागू होणार
जिल्हा प्रशासनाचे नियम प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी ऐकत नसतील, तर आता कोणाला काय म्हणावे? अशी चर्चा यावेळी कार्यालय परिसरात ऐकायला मिळाली. विशेष म्हणजे दर सोमवारी कंधारमध्ये आठवडी बाजार भरतो. या आठवडी बाजारातसुद्धा करोना नियमावलीचा फज्जा उडाल्याचे दिसले.