राज्यात करोनाचे निर्बंध काढले जाणार की नाही? यावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, आता त्यासंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून राज्यातील करोनाचे सर्व निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्यात आला आहे. याशिवाय, मास्क घालणं हे देखील बंधनकारक नसेल, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एबीपीशी बोलताना दिली आहे. “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रीमंडळाने गुढी पाडव्यापासून अर्थात २ एप्रिलपासून महाराष्ट्रातील सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना वाटत असेल मास्क लावावा, त्यांनी तो लावावा. ज्यांना वाटत असेल मास्क लावू नये, त्यांनी लावू नये. आता कोणतंही बंधन राज्यात राहिलेलं नाही”, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. त्यामुळे आता गुढी पाडवा, रमजान, राम नवमी असे सण साजरे करण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
येत्या १ एप्रिल ते ८ एप्रिलपर्यंत राज्य सरकारने संचारबंदी लागू केली होती. या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा, रामनवनी हे सण कसे साजरे करायचे? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता. विरोधकांनी यासंदर्भात राज्य सरकारवर सातत्याने टीका केली होती. यानंतर आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर हे सण धूमधडाक्यात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २ एप्रिल अर्थात गुढीपाडव्यापासून हे निर्बंध उठवण्यात आले आहेत.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वी बोलताना गुढीपाडव्यासाठी निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले होते. “शोभायात्रांना काही ठिकाणी परवानगी मिळाली असून मुंबईसह अन्य भागातील पोलीस राज्य सरकारच्या करोना निर्बंध शिथिलीकरणाच्या सूचनांची वाट पाहात आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना गुढीपाडव्यासाठी निर्बंध शिथिल केले जातील, असे नमूद करून टोपे म्हणाले, करोना रुग्णसंख्या घटल्याने मास्कसक्ती रद्द करण्याची मागणी अनेक संस्था, संघटना व नागरिकांनी केली आहे. मात्र त्याबाबत वैद्यकीय कृतीगटाची चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पाडव्याच्या निमित्ताने निघणाऱ्या शोभायात्रा व मिरवणुकांच्या परवानगीबाबत आणि निर्बंध शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे योग्य निर्णय घेतील”, असं राजेश टोपे म्हणाले होते. त्यानंतर आज झालेल्या बैठकीत निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातली ताजी करोना आकडेवारी..
गुरुवारी आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात १८३ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यभरात एका रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाल्याचं निदान झालं आहे. यासोबत एकूण २१९ रुग्ण बरे होऊ घरी परतले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत राज्यात ७७ लाख २५ हजार ३३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट आजघडीला ०९.९२ टक्के इतका आहे.