कारवाईतून मंत्र्यांना वगळले, संयोजकांवर गुन्हा
सोलापूर : करोनाविषयक जारी असलेली नियमावली आणि रात्री दहानंतर सार्वजनिक ठिकाणी जाहीर सभा, बैठक घेण्यास असलेली बंदी, ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापर करण्यावर असलेली बंदी, हे सारे नियम धाब्यावर बसवून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोलापुरात मध्यरात्रीनंतर जाहीर सभा घेतली तसेच बैठकांचा फडही रंगला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या मंत्र्यांना मोकळीक देत संयोजकांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जयंत पाटील व पालकमंत्री दत्तात्रेय भारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहरात काही स्थानिक नेते व कार्यकर्त्यांचा काल रात्री आठ वाजता राष्ट्रवादीत जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना तेथे पोहोचायला मध्यरात्री बारा वाजून गेले. कायद्यानुसार रात्री दहानंतर जाहीर सभा घेण्यावर, ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापर करण्यावर बंदी आहे. मात्र येथे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झालेली होती. या राजकीय उत्साहात मंत्रीही सामील झाले आणि रात्री बारानंतर सभेला जल्लोषात सुरुवात झाली.
भाजपचे शहर सरचिटणीस बिज्जू प्रधाने यांच्यासह माजी नगरसेवक सुभाष डांगे, मंदाकिनी तोडकरी, किशोर पाटील, सुनील पाटील, हर्षल प्रधाने, अमोल धंगेकर, मारुती तोडकरी आदींचे स्वागत करून या सर्वाना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. सत्तेतील प्रमुख पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांना मध्यरात्रीनंतरही नियम धाब्यावर बसवून जाहीर सभा घेता आली. हा प्रकार पोलिसांच्याही लक्षात आल्याने त्यांच्यावर कारवाईसाठी दबाव होता.