महाराष्ट्रात दिवसेंदिवस करोनाचा धोका पुन्हा वाढू लागला आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रातली रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रात तब्बल १३ हजार ६५९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या जवळपास ५ महिन्यांमध्ये राज्यात ही २४ तासांमधली सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे. त्यासोबतच राज्यात ५४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात ७ मार्च रोजी ११ हजार १४१, ८ मार्च रोजी ९ हजार ०६८ तर काल ९ मार्च रोजी १२ हजार १८२ नवे करोना बाधित सापडले होते. त्यामुळे करोनाचा राज्यातला आलेख वरच चढत असल्यामुळे प्रशासनासाठी ही मोठी चिंतेची बाब ठरली असून राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो का? अशी चर्चा देखील सुरू झाली आहे.
Maharashtra reports 13,659 new #COVID19 cases, 9,913 discharges and 54 deaths in the last 24 hours.
Total cases: 22,52,057
Total recoveries 20,99,207
Death toll 52,610
Active cases 99,008 pic.twitter.com/GQV7tn8R4l— ANI (@ANI) March 10, 2021
आजच्या आकडेवारीनुसार, दिवसभरात ९ हजार ९१३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आजपर्यंत करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या २० लाख ९९ हजार २०७ इतकी झाली आहे. करोनाचा रिकव्हरी रेट यामुळे अजूनही ९३.२१ टक्क्यांवर असला, तरी नवीन रुग्णवाढीचा दर वेगाने वाढू लागला आहे. आजच्या नव्या करोनाबाधितांच्या संख्येची भर पडल्याने राज्यातल्या एकूण अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ९९ हजार ००८ वर पोहोचला आहे. तर एकूण मृतांचा आकडा ५२ हजार ६१० झाला आहे.
मुंबईतही परिस्थिती चिंताजनक!
दरम्यान, महाराष्ट्राप्रमाणेच मुंबईची परिस्थिती देखील चिंताजनक होऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत एकट्या मुंबईत १ हजार ५३९ रुग्ण वाढले आहेत. ८ मार्च म्हणजेच दोनच दिवसांपूर्वी मुंबईत १ हजार ३६१ नवे करोनाबाधित सापडले होते. त्याआधी थेट २८ ऑक्टोबरला मुंबईत १३५४ रुग्ण सापडले होते. त्यामुळे मुंबईत देखील ५ महिन्यांनंतर मार्च महिन्यात करोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे.