गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरिएंटनं जगभरात भितीचं वातावरण निर्माण केलं आहे. भारतात आणि महाराष्ट्रात देखील ओमायक्रॉनचा फैलाव आता होऊ लागल्याचं चित्र दिसू लागलं आहे. आज दिवसभरात राज्यात ओमायक्रॉनचे २० नवे रुग्ण सापडले आहेत. यापैकी ६ रुग्ण पुण्यात, मुंबईत ११, साताऱ्यात २ तर अहमदनगरमध्ये १ रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता राज्यातल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १०८ इतकी झाली आहे. यापैकी सर्वाधिक ४६ रग्ण मुंबईत आहेत.

एकीकडे ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली असताना दुसरीकडे एकूण करोना रुग्णसंख्येत देखील आज दिवसभरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या २४ तासांत राज्यात एकूण १४१० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत राज्यात आढळलेल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा ६६ लाख ५४ हजार ७५५ इतका झाला आहे. त्यापैकी ८ हजार ४२६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्याचा रिकव्हरी रेट ९७.५९ टक्के!

राज्यात आज दिवसभरात ८६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे करोनावर मात केलेल्या महाराष्ट्रातील एकूण बाधितांचा आकडा आता ६५ लाख १ हजार २४३ इतका झाला आहे. या आकडेवारीनुसार राज्याचा रिकव्हरी रेट हा ९७.५९ टक्के इतका झाला आहे.

१२ करोनाबाधितांचा मृत्यू

दरम्यान, आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार आज दिवसभरात १२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा १ लाख ४१ हजार ४०४ इतका झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक १६ हजार ३६८ मृत्यू मुंबईत झाले आहेत. राज्याचा मृत्यूदर सध्या २.१२ टक्के इतका आहे.