साताऱ्यात बुधवारी कोविड महा लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात सव्वालाख नागरिकांना लस देण्यात आली. नागरिकांनी लसीकरणासाठी उत्स्फुर्त सहभाग घेतला. जिल्ह्यासाठी लसींचे एक लाख ४७ हजार ४०० डोस उपलब्ध होते व हे सर्व डोस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. साताऱ्यात मागील चार महिन्यांपासून लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. सुरुवातीला लसीचा डोस मोठ्या संख्येने उपलब्ध झाल्याने एका दिवसात ६० हजाराहून अधिक लसीकरण झाले होते. त्यानंतर लसीचे डोस कमी होण्यास सुरुवात झाल्याने मोहीम थंडावली होती. मात्र मागील काही दिवसात लसींचे डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने मोहिमेला वेग आला आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून जिल्ह्याला आतापर्यंत सर्वात जास्त ९० हजार डोस उपलब्ध झाले होते. त्यानंतर आज दीड लाख डोस उपलब्ध झाल्याने महा लसीकरण अभियान ठेवण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागात लसीकरण केंद्रावर गर्दी झाली होती. दिवसभरात दुपारपर्यंत एक लाख डोस देण्यात आले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सव्वा लाख डोस देण्यात आल्याची माहिती लसीकरण विभागातून देण्यात आली.
केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार साताऱ्यात कोविडं -१९ अंतर्गत लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे .या अंतर्गत सध्या सातारा जिल्ह्यातील १८ वर्षावरील सर्व लोकांना मोफत लसीकरण सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सातारा जिल्ह्यात लसीकरण करण्यात येत असून यामध्ये अखेर सातारा जिल्ह्यातील एकूण १३ लाख ९० हजार ५७ लोकांना लसीकरणाचा प्रथम डोस देण्यात आला आहे. ५ लाख ६५ हजार ३३८ लोकांना लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला असून आतापर्यंत एकूण १९ लाख ५५ हजार ३९५ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
“साताऱ्याला लसींचे डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने महा लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेसाठी लसीकरण मात्राची संख्या वाढविण्यात आली असून नागरिकांची गोंधळ न करता या मोहिमेत यशस्वी सहभाग नोंदविल.” असं नोडल अधिकारी प्रमोद शिर्के यांनी सांगितलं.लसीकरण जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय,उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी मोफत लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील शहरी विभाग सातारा,कराड, वाई, फलटण व कोरेगाव या ठिकाणी लसीकरणा करिता ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे.