पालघर जिल्ह्यात वसलेली आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असणाऱ्या बोईसर-तारापूर परिसरामध्ये करोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण (काल) रविवारी आढळून आला.
येथील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाला करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे चाचणीत निष्पन्न झाले. त्याला पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात यापूर्वी दाखल करण्यात आले होते. या रुग्णाच्या जवळच्या संपर्कात असलेल्या ३५ जणांना क्वारंटाइनमध्ये पाठवण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
तारापूर औद्योगिक परिसराच्या लगत असणाऱ्या या भागात मोठ्या संख्येने कामगार व अधिकारी वर्ग राहत असून बोईसर येथे करोना संसर्गाचा रुग्ण आढळल्याने या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय व्यवस्थेला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
औद्योगिक परिसरात अनेक कारखाने अत्यावश्यक सेवेतील उत्पादन बनवत असल्याने तसेच काही उद्योग सलग उत्पादन प्रक्रियेच्या नावाखाली सुरु असून सुमारे पन्नास हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या या भागाला करोना संसर्गाचा धोका संभवत आहे.