|| तानाजी काळे

इंदापूर : करोना विषाणू संसर्गामुळे सलग दोन वर्षे गाव यात्रा-जत्रेतील कुस्त्यांचे आखाडे बंद राहिल्याने महाराष्ट्रातील तांबड्या मातीशी नाते असलेल्या पैलवानांची निराशा झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये ग्रामदैवताच्या यात्रा-जत्रा निमित्ताने भरवण्यात येणारे कुस्त्यांचे आखाडे दुसऱ्याही वर्षी रद्द करण्यात आले आहेत. नामवंत तालमीत प्रशिक्षण आणि कुस्त्यांचे सराव करत असलेल्या पैलवानांनी गावाकडचा रस्ता धरला असून ठिकठिकाणच्या तालमी व गाव यात्रेतील आखाड्याची मैदाने ओस पडली असल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागातून कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर त्याचबरोबर अन्य तालुक्यांच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कुस्त्यांच्या प्रशिक्षणासाठी तालमीमध्ये पैलवान मोठ्या संख्येने जात असतात. वाढत्या महागाईच्या काळात खुराकासाठी मोठा खर्च त्यांच्या पालकांना सोसावा लागतो. मात्र, यात्रा-जत्रांमधील कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये आपले कसब पणाला लावून पैलवान मंडळी निम्मा खर्च वसूल करतात. सलग दोन वर्ष महाराष्ट्रामध्ये कोणत्याच प्रकारच्या कुस्त्या न झाल्यामुळे आणि पुढील चित्र स्पष्ट नसल्याने पैलवान शेती आणि अन्य कामामध्ये मग्न झाल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्राच्या तांबड्या मातीची परंपरा आजही राज्यातील अनेक गावांनी चांगल्या प्रकारे जपली आहे. आपल्या ग्रामदैवताच्या यात्रेतील वर्गणीचा मोठा हिस्सा कुस्त्यांचा आखाडा आणि  पैलवानांना देण्यात येणाऱ्या इनामासाठी खर्च करण्याची परंपरा पाळली जाते. यातून दरवर्षी मोठी आर्थिक उलाढाल होत असते. मात्र, सलग दोन वर्ष यात्रा बंद असल्यामुळे कोणत्याही गावांमध्ये वर्गणी काढण्यात आलेली नाही.

महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राची परंपरा कायम ठेवण्यासाठी राज्यातील अनेक पैलवानांनी मोठे योगदान दिले. काही पैलवानांनी आपआपल्या गावामध्ये कुस्त्यांचे प्रशिक्षण केंद्रे उभी केली. काही पैलवानांनी गावाला हजारो रुपये खर्चून आखाडे बांधून दिले.

आजही अनेक नामवंत मल्ल या क्षेत्रामध्ये येऊ  इच्छिणाऱ्या नवीन मल्लांना मार्गदर्शन करीत असल्याचे चित्र दिसत असताना करोना विषाणूमुळे हे क्षेत्र डबघाईला आले आहे. पुढील काळामध्ये पैलवानांची संख्या घटण्याची भीती पळसदेव (ता. इंदापूर) येथील कुस्तीप्रेमी बाळासाहेब नायकवाडी यांनी व्यक्त केली.

करोना संसर्गामुळे  मल्लांवर संकट कोसळले आहे. नित्याच्या सराव, मेहनतीमध्ये खंड पडला आहे. व्यायाम थांबल्याने पुन्हा शरीर पूर्ववत धष्टपुष्ट करण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत. मल्लांचा मासिक खर्च पंधरा हजारांच्या आसपास असून त्याचाही आर्थिक बोजा त्यांना व कुटुंबीयांना सहन करावा लागत आहे. तालमी बंद झाल्या असल्याने मल्ल गावी गेले आहेत. तेथे त्यांचा नीटसा सराव होत नाही. करोना संकट दूर होत नाही तोवर कुस्ती क्षेत्रासमोरील अडचणी दूर होणे कठीण आहे.    – हिंद केसरी विनोद चौगुले, मोतीबाग तालीम, कोल्हापूर