मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे रोजच सत्तेसाठी घडले-बिघडले चालू असल्याने दुष्काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यास सरकार कोणतेच पाऊल उचलत नाही, असा आरोप करून येत्या दहा दिवसात दुधाची दरवाढ न केल्यास मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांना नासलेल्या दुधाने अभिषेक घालू, असा इशारा माजी मंत्री सुरेश धस यांनी दिला.
आष्टी-नगर रस्त्यावर गुरुवारी राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ व दूध दरवाढीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांसमोर धस म्हणाले की, दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याने घराघरात सुतक पडले आहे. मात्र, सरकार वाचवण्यासाठी रोज ‘घडले-बिघडले’चा खेळ सुरू आहे. मंत्री नुसत्या गप्पा मारण्यात मग्न आहेत. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते विदर्भाचे नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे. मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील बँकांना कोटय़वधींची मदत केली. मात्र, बीड जिल्हा बँकेला मदत केली नाही. या बँकेला ३०० कोटींची मदत द्यावी, अशी मागणी धस यांनी केली. येत्या दहा दिवसात दूध दरवाढ न केल्यास मुख्यमंत्र्यांसह राज्यातील प्रत्येक मंत्र्याचा नासलेल्या दुधाने अभिषेक करू,असा इशाराही त्यांनी दिला. या वेळी दोन तास नगर महामार्ग अडविण्यात आला होता.

Story img Loader