राज्यातील करोना संसर्ग अद्याप अटोक्यात अलेला नसला तरी याचे प्रमाण काहीसे कमी होताना दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आढळून आलेली असताना, आज दिवसभरात पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या काहीशी अधिक आढळून आली आहे. आज राज्यात २४ हजार ७५२ नवीन करोनाबाधित आढळले असून, ४५३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २३ हजार ६५ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत.
राज्यात आजपर्यंत एकूण ५२,४१,८३३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.७६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६२ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३८,२४,९५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,५०,९०७ (१६.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,७०,३२६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १९,९४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,१५,०४२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला असून ठाकरे सरकार लॉकडाउन वाढवणार की, उठवणार यासंबंधी सध्या चर्चा सुरु आहे. करोनाला आटोक्यात आणण्यासाठी ठाकरे सरकारने कठोर निर्बंध जाहीर केले असून परिस्थिती नियंत्रणात नसल्याने लॉकडाउन वाढवण्यात आला होता. पण सध्या दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत असल्याने लॉकडाउन शिथील करण्याची मागणी होत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता ठाकरे सरकार लॉकडाउन उठवणार की, नाही याबाबत साशंकता आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत महत्वाचं विधान केलं आहे.
“महाराष्ट्रात लॉकडाउन सरसकट उठवणं अडचणीचं ठरेल”
“राज्यात ३१ तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे. राज्यातील १५ जिल्हे असे आहेत जिथे पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. काही जिल्ह्यात तीन ते पाच टक्के प्रमाण आहे. सरसकट लॉकडाउन उठवता येत नाही. परिस्थितीचा आढावा घेऊनच लॉकडाउनसंदर्भात निर्णय घेतला जाईल. पण लॉकडाउन सरसकट उठवणं अडचणीचं ठरेल. निर्बंध शिथील करण्यासंबंधी मुख्यमंत्री ३१ मे च्या आधी निर्णय घेतील,” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.