महाराष्ट्रात आतापर्यंत ३८ जणांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. रविवारपर्यंत रुग्णांचा आकडा ३३ होता. सोमवारी अजून पाच जणांना लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. यामध्ये मुंबईतील तिघे, नवी मुंबईतील एक आणि यवतामधील एका रुग्णाचा समावेश आहे. यवतामधील महिला काही दिवासंपूर्वी दुबईतून आली होती. तिची तपासणी केली असता करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. तर मुंबई आणि नवी मुंबईतील रुग्णांपैकी दोन जण कुटुंबाच्या संपर्कात आले होते. तर इतर दोघेजण परदेशात प्रवास करुन आलेले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात कुठे किती रुग्ण ?
पिंपरी चिंचवड – ९
पुणे – ७
मुंबई – ६
नागपूर – ४
यवतमाळ – ३
कल्याण – ३
नवी मुंबई – २
रायगड – १
ठाणे – १
अहमदनगर – १
औरंगाबाद – १

राजेश टोपे यांनी यावेळी कोणाचीही प्रकृती चिंतानजक नसल्याचं सांगितलं आहे. तसंच यापैकी १८ ते १९ लोक बाहेरुन आले आहेत. त्यांच्यामुळे इतर १० ते १५ लोकांना लागण झाली.

महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा राज्य सरकारचा आदेश
करोना व्हायरसचा फैलाव वाढत असल्याने राज्य सरकारने मोठा निर्णय घेत महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसंच निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात येतील का यासंबंधी निवडणूक आयोगाकडे विचारणा केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती देताना करोनाची लागण झाल्याने घरात विलगीकरण करून ठेवलेल्यांच्या हातावर शिक्का मारणार असल्याचं सांगितलं. तो रूग्ण कळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले होते. रेल्वे स्वच्छ करण्याच्या तसंच सॅनिटाझर ठेवा, गर्दी कमी करा अशा सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला असून मंत्रालयात कोणीही येऊ नये असं आवाहन त्यांनी केलं. राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला असून त्यांना जास्त लोकांना बोलावू नका. ईमेलचा वापर करा असं सांगण्यात आलं आहे. जिथे अनावश्यक फक्त मनोरंजनासाठी गर्दी केली जाते. त्याठिकाणी जमावबंदी लागू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus 38 patients in maharashtra health minister rajesh tope sgy