उस्मानाबाद जिल्ह्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयातील विशेष कक्षात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पानिपत, दिल्ली येथून चार दिवसांपूर्वी तो उमरगा तालुक्यातील आपल्या गावी परतला होता. बुधवारी त्रास जाणवत असल्यामुळे पत्नीसह उमरगा रुग्णालयात स्वतःहुन दाखल झाला होता. आज त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र पत्नीचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आहे.
चार दिवसांपूर्वी तो उमरगा तालुक्यातील आपल्या मूळ गावी परतला. त्यानंतर मंगळवारी रात्रीपासूनच त्रास जाणवत असल्याने बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास तो स्वतःहून पत्नीसह उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला. तत्काळ दोघांच्याही घश्यातील स्त्रावाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. गुरुवारी रात्री तपासणी अहवाल प्राप्त झाला असून पतीचा अहवाल पॉझिटिव्ह तर पत्नी निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाला आहे.
उस्मानाबादचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राज गलांडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सदरील 30 वर्षीय रुग्ण हा दिल्ली व पानिपत येथे फिरायला गेला होता व तो चार दिवसांपूर्वी उमरगा येथे आला होता, त्यांनतर त्याचे स्वॅब नमुने घेतले होते त्यातील एका व्यक्तीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर उमरगा उपजिल्हा रुग्णालयाच्या कक्षात उपचार सुरू असल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक गलांडे यांनी दिली