विलगीकरणाचा सल्ला देण्यात आलेल्या नागरिकांच्या डाव्या हातावर शिक्का मारला जाईल. म्हणजे समाजात वावरताना त्यांची ओळख पटू शकेल. खबरदारीचा उपाय म्हणून हा उपाय योजण्यात येत असल्याची माहिती सोमवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. अशा पद्धतीने शिक्का मारण्यास आज पासून सुरुवात झाली आहे. तळहाताच्या मागच्या बाजूला हा शिक्का मारला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरामध्येच विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींना निवडणुकांमध्ये मतदान केल्यानंतर लावली जाते त्यापद्धतीने शाईचा शिक्का मारला जाईल अशी माहिती टोपे यांनी कालच दिली होती. सोमवारी मुंबईमध्ये आरोग्य खात्याची मुख्यमंत्र्यांबरोबर एक विशष बैठक पार पडली त्यामध्येच हा निर्णय घेण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले होते. परदेशातून आलेल्या नागरिकांचे तीन प्रकारांमध्ये वर्गिकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

करोनाग्रस्त देशांच्या यादीमध्ये दुबई, अमेरिका आणि सौदी अरेबिया या तीन नवीन देशांचा समावेश करण्यात आला आहे. या देशांमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना घरीच विलगीकरण (होम क्वॉरंटाइन) करण्यात येणार असून त्यांना मतदानानंतर करतात त्याप्रमाणे शाई लावून मार्क करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केलं होतं. अशाप्रकारे शिक्का मारण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. विमानतळावरुन बाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या डाव्या हातावर हा शिक्का मारला जात आहे. शिक्क्यामध्ये ‘प्राऊड टू प्रोटेक्ट मुंबईकर्स होम क्वॉरंटाइन्ड’ असं लिहिण्यात आलं असून त्याखाली किती दिवस ही व्यक्ती विलगीकरणामध्ये राहणार आहे याच्या मुदतीची तारीख देण्यात आली आहे.

करोनाग्रस्त देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची तीन प्रकारांमध्ये विभागी करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितलं. “दहा करोनाग्रस्त देशांमधून येणाऱ्या लोकांना ए, बी आणि सी प्रकारामध्ये विभागले जाणार आहे. ए मध्ये थेट लक्षणे दिसणे प्रवासी, बी मध्ये वयस्कर प्रवासी आणि कुठलीही लक्षणे न दिसणारी तरुण मुले सी कॅटेगरीमध्ये असतील,” असं टोपे यांनी सांगितलं. ए आणि बी मधील प्रवाशांची चाचणी करुन त्यांच्यावर उपचार केले जातील. तर लक्षणे न दिसणाऱ्या सी प्रकारातील प्रवाशांची प्राथमिक तपासणी करुन त्यांना शिक्का मारून होम क्वॉरंटाइन केले जाईल, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.

आणखी वाचा- आपल्यासाठी पुढील दोन आठवडे का अत्यंत महत्त्वाचे? वाचा ही माहिती

शिक्क्याचा फायदा काय?

होम क्वॉरंटाइन केल्या जाणाऱ्या लोकांना निवडणुकांच्या वेळी मतदान केल्यानंतर लावली जाते तशा पद्धतीच्या शाईचा शिक्का मारला जाईल. अशी शाई लावलेले लोक हे हातावरील शिक्क्यावर असणाऱ्या तारखेपर्यंत होम क्वॉरंटाइन आहेत असा त्याचा अर्थ होईल. असे शिक्के मारल्याने अशी होम क्वॉरंटाइन केलेली लोकं घराबाहेर पडली तर इतरांना या लोकांना होम क्वॉरंटाइन केलेलं हे कळेल. शिक्के मारल्याने होम क्वॉरंटाइन केलेले लोक घरीच थांबतील अशी अपेक्षा यंत्रणांना आहे. तसेच अशी लोकं फिरताना दिसल्यास यासंबंधित सरकारी यंत्रणांना माहिती देणेही सोपे जाईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus gov started stamping suspects under home quarantine on their left hand scsg