देशात आणि राज्यात करोनामुळे पहिल्यादांच लॉकडाउन लागू झाला आहे. करोनानं शिरकाव करताच केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलणं आवश्यक होती, अशी टीका राजकीय नेत्यांकडून करण्यात आली होती. मात्र, ही वेळ टीका करण्याची नाही, असं सरकार आणि भाजपा नेत्यांकडून सांगण्यात आलं. त्यावरून ब्रिजेश कलाप्पा यांची एक पोस्ट राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केली आहे.

चीननंतर देशातील अनेक राष्ट्रात करोनाचा उद्रेक झाल्यानं भारतात केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलायला हवीत अशी मागणी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह काही नेत्यांनी केली होती. त्याचबरोबर लॉकडाउनचा निर्णय घ्यायला केंद्रानं उशीर केला, असा तक्रारीचा सूर राजकीय वर्तुळातून उमटला होता. लॉकडाउन लागू केल्यानंतर केंद्रानं जाहीर केलेल्या पॅकेजवरही टीका करण्यात आली होती. त्यावर ही वेळ टीका करण्याची नसल्याचं भाजपाच्या आणि केंद्र सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं होतं. याचं अनुषंगानं असलेली ब्रिजेश कलाप्पा नावाच्या व्यक्तीची पोस्ट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केली आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

‘नोटबंदीनंतर : ही टीका करण्याची वेळ नाही
जीएसटी लागू केल्यानंतर : ही टीका करण्याची वेळ नाही
करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर : ही टीका करण्याची वेळ नाही.
मोदी सरकारनं टीका करण्यासाठी वेळ ठरवून द्यायला हवी.’
असं या पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे. ही पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन लागू केल्यानंतर केंद्र सरकारनं मदत करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर केंद्र सरकारनं १ लाख ७० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं. यात शेतकऱ्यांपासून ते हातावर पोट भरणाऱ्यांपर्यंत मदत देण्याची घोषणा केली.