करोनाच्या संकटानं संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये गेला आहे. वेगान होत असलेला संसर्ग आणि करोनाग्रस्तांची वाढत असलेली संख्या देशाच्या चिंतेत भर घालत आहे. महाराष्ट्रातही चिंताजनक परिस्थिती निर्माण होण्याआधीच संचारबंदी करण्यात आली. त्यामुळे मराठी नव वर्षांचा उत्साह कमी दिसून येत आहे. अनेक नेत्यांनी, सेलिब्रिटींनी गुढी उभारतानाचे फोटो शेअर केले. पण, भाजपाच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गुढी न चढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एक निर्धारही त्यांनी केला आहे.
सुरूवातीच्या काही दिवसानंतर राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या अचानक वेगानं वाढायला लागली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी बंद करण्यासाठी टोकाचं पाऊल उचलतं राज्यात संचारबंदी लागू केली. त्याचबरोबर संचारबंदीच पालन करत गुढीपाडवा साजरा करावा असं आवाहनही केलं.
करोनामुळे गुढीपाडव्याचा उत्साह कमी झाला आहे. काही जणांनी गुढी उभारणतानाचे फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गुढी न उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ‘करोनानं थैमान घातल्यामुळे कितीतरी जीव गमावले. इटलीसारखा सुंदर देश, अमेरिका एक बलाढ्य राष्ट्र ही करोनासमोर अस्वस्थ लढत आहे. आणि आज गुढी पाडवा, पण मी आणि माझ्या परिवाराने ठरवलं आहे की आज गुढी चढवायची नाही. जेव्हा करोना हरेल आणि भारत जिंकेल, तेव्हा गुढी उभारायची नव्या पहाटेची!,’ असा निर्णय पंकजा मुंडे यांनी जाहीर केला आहे.
कोरोना च्या थैमान घातल्यामुळे कितीतरी जीव गमावले..इटली सारखा सुंदर देश ,अमेरिका एक बलाढ्य राष्ट्र ही कोरोना समोर अस्वस्थ लढत आहे ..आणि आज गुढी पाडवा पण मी आणि माझ्या परिवाराने ठरवलं आहे की आज गुढी चढवायची नाही,जेव्हा कोरोना हरेल आणि भारत जिंकेल तेव्हा गुढी उभारायची नव्या पहाटेची!
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 25, 2020
‘असंख्य मृत्यूमुळे, जगातील लोकांच्या दुःख व व्याधीमुळे ही गुढी सजवताना मन विचार करतंय सर्व दुर्दैवी घाबरलेल्या लोकांच्या जीवनात काय उलथापालथ झाली असेल? जगाची आर्थिक, सामाजिक आणि आरोग्याची ही विस्कटलेली घडी नीट होईल तेव्हाच आनंद आणि विजयाची गुडी उभारणार, जसा घंटा नाद केला तसा,’ असा निर्धार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
असंख्य मृत्यू मुळे ,जगातील लोकांच्या दुःख व व्याधी मुळे ही गुढी सजवताना मन विचार करतंय सर्व दुर्दैवी घाबरलेल्या लोकांच्या जीवनात काय उलथापालथ झाली असेल?जगाची आर्थिक सामाजिक आणि आरोग्याची ही विस्कटलेली घडी नीट होईल तेव्हाच आनंद आणि विजयाची गुडी उभारणार, जसा घंटा नाद केला तसा ..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 25, 2020
याचबरोबर ‘बीड जिल्ह्यातील प्रशासन, जिल्हाधिकारी रेखावर, पोलीस अधीक्षक पोद्दार, मुख्यकार्यकारी अधिकारी कुंभार आणि शल्य चिकित्सक थोरात व पूर्ण टीम स्वतःच्या जवाबदारीचे भान राखून स्वयंप्रेरणेने आमचा जिल्हा सांभाळत आहेत. धन्यवाद आणि शुभेच्छा !कडक आणि संयमी राहून निर्णय घ्या! आम्ही आहोत सोबत तुमच्या!,’ अशा शब्दात प्रशासनाच्या कामाची दखल घेत आभार मानले आहे.