चीनमध्ये उपद्रव करणाऱ्या करोनानं जगभरात थैमान घातलं. परदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून करोनानं भारतातं पाऊल ठेवलं. हळूहळू करोनाचा प्रभाव वाढत चालला असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांना करोनाचा संसर्ग झाला आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या संकटावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दीर्घ भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा ७४वर पोहोचला आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जवळपास लॉक डाऊन करण्याची तयारी सुरू आहे. करोनाच्या विषाणूनं मानवी अस्तित्वाला आव्हान दिलं असून, संजय राऊत यांनी रोखठोक या सदरातून त्यावर भाष्य केलं आहे आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

करोना व्हायरसच्या विळख्यात जग तडफडताना दिसत आहे. जगाची इतकी तडफड दुसऱया महायुद्धातही दिसली नव्हती. स्वतःस ‘सुपर पॉवर’ समजणारे बहुतेक सर्व देश करोना व्हायरसपुढे हतबल झाले आहेत. चंद्रावर आणि मंगळावर ‘पाय’ ठेवणाऱ्या अमेरिकेत राष्ट्रीय आपत्ती आणि आणीबाणीच जाहीर केली आहे. साऱ्या जगावर एकेकाळी राज्य करणाऱ्या ग्रेट ब्रिटनने तर स्वतःला कोंडून घेतले आहे. सम्राज्ञी एलिझाबेथ यांना त्यांच्या राजप्रासादातून ‘वेगळे’ केले आहे. अनेक मोठ्या देशांत हे घडत आहे. निसर्गाने मानवी अहंकाराचा, देव-धर्माचा केलेला हा पराभव आहे. संकटकाळी माणूस देवाला शरण जातो. करोनामुळे उलटेच झाले आहे. धर्म हा तर सध्याच्या राजकारणाचे सगळ्यात मोठे भांडवल झाले आहे, पण ‘करोना’ प्रकरणात स्वतः देवांनाच विषाणूंपासून संरक्षण द्यायची वेळ आली. हिंदू, इस्लामी, बुद्ध असे सर्वच धर्मीय देश जणू मरून पडले आहेत. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील ‘देवळे’ करोनाच्या भीतीने बंद करावी लागली. भक्तांचा ओघ आहे म्हणून मंदिरातील दगडी मूर्तींना देवत्व प्राप्त होते. भक्तांचा ओघच थांबला. त्यामुळे कसले देव आणि कसले देवत्व? महाराष्ट्रात ‘करोना’ व्हायरस वाढू नये म्हणून सिद्धिविनायक मंदिर बंद केले. तुळजापूरचे भवानी मातेचे मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, त्र्यंबकेश्वरचे मंदिर बंद केले आहे. शिर्डीत शुकशुकाट आहे. मुंबईतील बाबुलनाथ मंदिर बंद करण्यात आले आहे. देवांनी अनेक असुरांचा वध केला असे पुराणात सांगितले गेले, पण एक विषाणू देवांवर भारी पडला.

मक्का ते व्हॅटिकन

मक्केपासून व्हॅटिकनपर्यंत आणि बालाजीपासून बुद्ध गया मंदिरापर्यंत ‘कोविड-19’ म्हणजे करोनाने सिद्ध केले की, माणसांवर येणाऱ्या प्रत्येक संकटप्रसंगी ईश्वर सगळ्यात प्रथम मैदान सोडून जातो, असे तस्लिमा नसरीननं नुकतेच म्हटले आहे. मक्केत सर्व काही ठप्प आहे. पोपचा ईश्वराशी संवाद सध्या बंद आहे. पुजारी मंदिरातील मूर्तींना मास्क लावून धर्मकांड करीत आहेत. सर्वच धर्मांनी व त्यांच्या ठेकेदारांनी करोना व्हायरसने भयभीत मानवांना असहाय्य अवस्थेत निराधार करून सोडून दिले आहे. त्याच धर्मासाठी हिंदुस्थानसह जगभरात रक्तपात आणि हिंसाचार होतो, पण ‘करोना’च्या हल्ल्यातून एकही धर्म वाचला नाही. यातून कोणी शहाणपण घेईल काय? मदिनेत पैगंबर मोहंमदांचे जेथे दफन झाले तेथील ‘तीर्थयात्रा’ स्थगित केली आहे. या वेळी हजयात्राही करोनामुळे होईल काय ही शंकाच आहे. अनेक मशिदींत जुम्माचा नमाज स्थगित केला आहे. कुवेतमध्ये विशेष अजान करून लोकांना घरीच ‘इबादत’ करण्याचा आग्रह केला आहे. मौलवीसुद्धा आता ‘इस्लाम खतरे मे’ची बांग देताना दिसत नाहीत आणि करोनापासून बचाव करण्यासाठी मशिदीत जाऊन अल्लाकडे दुवा मागा असे सांगत नाहीत. कारण त्या सर्वच धर्मांच्या ठेकेदारांना आता खात्री पटली आहे की, ‘अल्ला’ आता आपल्याला नॉव्हेल करोना व्हायरसपासून वाचवायला येणार नाही. फक्त वैज्ञानिकच वाचवू शकतील. जे व्हायरसवर ‘लस’ शोधण्याची शर्थ करीत आहेत.

आणखी वाचा- ‘जनता कर्फ्यूत’ वाढ होण्याची शक्यता; संजय राऊत यांनी दिले संकेत

नवसाचे देव

करोनाशी सामना करण्यात नवसाचे देवही तोकडे पडले. ‘गोमांस’ घरात ठेवणे हा धर्मद्रोह आहे असे ठरवून माणसे मारण्यात आली, पण जे गोमांस खात नाहीत तेसुद्धा ‘करोना’चे शिकार झाले. महाराष्ट्रात गाडगेबाबांनी जे सांगितले तेच शेवटी खरे ठरले. नवस, आवस, देव-धर्म खरा नाही. मानवता हाच धर्म आहे हे सांगणारे गाडगेबाबा खरे. देवळात जाऊ नका. मूर्तीची पूजा करू नका. देवापुढे पैसा, फूल ठेवू नका. तिर्थी धोंडा पाणी! सत्यनारायण पुजू नका. पोथी पुराणातल्या चमत्कारांवर विश्वास ठेवू नका. प्राण्यांची हत्या करू नका. दारू पिऊ नका. सावकारांचे कर्ज काढू नका. आपल्या मुलांना जास्तीत जास्त शिक्षण द्या, असे गाडगेबाबा कीर्तनात सांगत. गाडगेबाबांनी कोणत्याही मूर्तीपुढे कधीच मान तुकवली नाही. ते विज्ञानवादी संत होते. नवस-आवस करून महामारी पळत नाही हे त्यांनी सांगितले. ते पुनः पुन्हा खरे ठरले. येशूनेही चमत्कार केला नाही. मक्का-मदिनाने चमत्कार केला नाही आणि देवही लोकांपासून वेगळे झाले. शेवटी विज्ञान व वैद्यकीय ज्ञानाच्या जोरावर माणसेच कोरोनाशी लढत आहेत. लोकांना घरी बसावे लागले. लोकांचा रोजगार गेला. देवाच्या दानपेटीतला पैसा कमी झाला हे सत्य आहे, पण लोकांच्या मदतीला धर्माची कोणतीही शक्ती आली नाही. तोंडास फडके बांधावेच लागले व सॅनिटायझर नावाच्या द्रवाने हात सतत साफ करीत काम करीत राहावे लागले. शेवटी देव दगडाचाच आणि माणूसच खरा!

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus in maharashtra sanjay raut write about coronavirus and religion bmh
Show comments