व्यसन माणसाला स्वस्थ बसू देत नाही, असं म्हटलं जातं. हे एका अर्थान खरं असल्याची प्रचिती सांगली जिल्ह्यात घडलेल्या दोन घडनांमधून येतं आहे. देशात आणि राज्यात लॉकडाउन असल्यामुळे अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंच्या विक्री व्यतिरिक्त सर्व काही बंद आहे. त्यामुळे दारूच्या आहारी गेलेल्या तळीरामांची सध्या घालमेल सुरू आहे. शोध घेऊनही कुठेच दारू मिळत नसल्यानं काही तळीरामांनी चक्क देशी दारुचं दुकानं फोडली. सांगली आणि मिरज शहरात या घटना घडल्या आहेत.
देशात आणि राज्यात करोनाचा प्रसार वेगानं होत असल्याचं लक्षात आल्यानंतर राज्य सरकारनं संचारबंदी आदेश लागू केले. त्यानंतर केंद्र सरकारनं देशभरातच लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. यामुळे गेल्या आठ दिवसांपासून देशभरात जीवनावश्यक वस्तुंची विक्री वगळता सर्व व्यवहार ठप्प आहेत. विशेषतः मद्यपान करणाऱ्यांची या निर्णयामुळे मोठी अडचण होऊन बसली आहे. त्यामुळे तल्लफ पूर्ण करण्यासाठी आता वेगवेगळे मार्ग तळीराम स्वीकारताना दिसत आहे. अशाच दोन घटना सांगली आणि मिरजमध्ये घडल्या.
दारू मिळवण्यासाठी काही तळीरामांनी चक्क देशी दारूच्या दुकानावरच डल्ला मारला. दुकान फोडत मद्यपान तर केलच त्याचबरोबर दारुच्या बाटल्याही लंपास केल्या. ही घटना नंतर दुकान मालकाच्या लक्षात आली. त्यानं तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेत झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत काही तळीरामाचा शोधही घेतला.
पोलिसही चक्रावले-
संचारबंदी आणि लॉकडाउनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहे. त्याचबरोबर गुन्ह्यांचं प्रमाणही घटलं आहे. सर्वच प्रकारचे गुन्ह्यांमध्ये घट झालेली असताना दारूची दुकान फोडण्यात आल्यानं पोलिसांनाही धक्का बसला. याप्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.