माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कोणतीही मागणी करण्यात आली नसल्याचं सांगितलं आहे. तसंच भाजपाला सरकार स्थापन करण्याची कोणतीही इच्छा नसून, ही योग्य वेळ नाही असंही ते म्हणाले आहेत. सध्या करोना महामारीशी लढा देणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वी भाजपा नेते नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेत महाविकास आघाडी सरकार करोनाची परिस्थिती सांभाळण्यात अपयशी ठरत असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली होती. भाजपाला राष्ट्रपती राजवट हवी आहे का ? असं विचारण्यात आलं असता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “आम्ही राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली नाही. भाजपाची सध्या सरकार स्थापन करण्याची कोणतीही इच्छा नाही. ही योग्य वेळ नाही. सध्या करोनाशी लढा देणं जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही गरिब, शेतकरी आणि इतरांना मदत करण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. सध्या सरकार बदलण्याची ही योग्य वेळ आहे असं मला वाटत नाही”.
आणखी वाचा- … आणि गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही; जितेंद्र आव्हाडांचा भाजपावर हल्लाबोल
याआधी पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी करोनापेक्षा भाजप हा मोठा शत्रू असल्याचे सरकारला वाटत आहे. आम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही. भाजपा खासदार नारायण राणे यांना अन्याय सहन होत नसल्याने त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली असावी, पण भाजपचे तसे मत नसल्याचं स्पष्ट केलं होतं.